नाशिकरोडला खंडणीप्रकरणात चार महिलांविरोधात गुन्हा!

नाशिकरोड (प्रतिनीधी): पती विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका महिलेकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार महिलांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिला कैलास मैड (वय ४३, रा. जेलरोड) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास प्रमिला यांना अनोळखी महिलेचा फोन आला. फोन करणा-या महिलेने जेलरोड येथील सैलानी बाबा चौकात भेटायला या, असे सांगितले असताना मैड या त्यांच्या मुलासोबत गेल्या. त्याठिकाणी अर्चना, स्नेहल, कविता, रंजना नामक संशयित महिलांनी ‘काही राजकीय लोकांकडून तुझ्या पतीला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे काम आम्हाला दिले आहे’ असे फिर्यादीस सांगितले. हे थांबवायचे असेल तर आम्हाला ५ लाख रुपये दे, नाही तर तुझ्या कुटुंबाला संपून टाकू’, अशी धमकी दिल्याचे मैड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार, पोलिसांनी संशयित महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!