नाशिक (प्रतिनीधी): महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक अशा चार लाख ११ हजार थकबाकीदार ग्राहकांकडे एकूण ५६ कोटी ३३ लाख रुपये वीज देयक थकबाकी आहे. ग्राहकांना गतिमान सेवा देण्यासाठी ही थकबाकी वसुली अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत कार्यकारी अभियंत्यांनी स्वत: या मोहिमेत सहभागी होऊन ती यशस्वी करावी, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर यांनी केले.
नाशिक परिमंडळातील सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंते आणि अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. नाशिक येथील ऊर्जा व्यवस्थापन आणि प्रशिक्षण संस्था येथील सभागृहात झालेल्या या बैठकीत, ग्राहकसेवा देणा-या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या पुनर्रचनेचा आढावा घेण्यात आला. आता गतिमान ग्राहक सेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आली असून या माध्यमातून महावितरण कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण कमी होणार आहे.
सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवण्यासाठी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या कामाची माहिती घेऊन ग्राहकांना अखंडित वीज सेवा देण्यासोबतच वापरलेल्या विजेचे दरमहा अचूक वीजबिल देण्यावर त्यांनी भर दिला. सर्व वीज जोडणी तथा इतर सेवा ग्राहकांना निर्धारित वेळेतच दिल्या गेल्या पाहिजेत. यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत, प्रत्येक महिनाअखेर वीज देयकाची शून्य थकबाकी मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन कार्यकारी संचालक पडळकर यांनी केले.
या बैठकीला नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे, रमेशकुमार पवार, देवेंद्र सायानेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे व हेमंत भामरे तसेच अहिल्यानगर, नाशिक व मालेगाव मंडळातील कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.
