बंद फ्लॅटमधून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
दिंडोरी रोडवरील जनलक्ष्मी बँकेमागे असलेल्या बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. शानू वर्मा-डफळे (रा. तुळजा बंगलो, दिंडोरी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, दि. ९ तारखेला मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरफोडी करीत २३ हजारांची रोकड व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
कामटवाडेत दागिन्यांसह ७१ हजारांची चोरी
अभियंतानगर, कामटवाडा येथील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडत चोरट्यांनी ७१ हजारांचा ऐवज चोरून नेला. संदीप शंकर नेरकर (रा. योगेश्वर अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडा) यांच्या फियार्दीनुसार, शनिवारी (दि.१२) चोरट्यांनी बंद फ्लॅटचे लॉक तोडून १३ हजारांची रोकड व सोन्याचे दागिने असा ७१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल आहे.
घरफोडीत सव्वातीन लाखांचा ऐवज चोरीस
बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना म्हसरुळ हद्दीतील मखमलाबाद लिंकरोडवर घडली. सोनाली रमेश पवार (रा. श्रीदत्तकृपा अपार्टमेंट, मखमलाबाद लिंकरोड) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, शुक्रवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास त्या बाळाला उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश करत ८१ हजार ३०० रुपयांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख २९ हजार ४५० रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल आहे.
