कर्तव्यावरील असलेले अधिकारी, कर्मचा-यांनी प्रथमदर्शनी कसूर केली: चौकशी समितीचा ठपका
नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा शासकीय रुग्णालयातील बहुचर्चित अर्भक अदलाबदल प्रकरण हे वैद्यकीय अधिका-यांसह सर्व पारिचारिकांच्या चांगलेच अंगलट आले असून जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. १५) रात्री अर्भक अदलाबदलीचे प्रकरण समोर आले. महिलेच्या प्रसूतीनंतर तिला मुलगा झाल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत कागदोपत्री नोंद करण्यात आली होती. अन्ननलिकेत दोष असल्याच्या कारणातून त्या बालकाला पुढील उपचारार्थ खासगी रुग्णायात हलविण्याचा निर्णय झाल्याने हा गोंधळ उडाला होता. प्रसूत महिलेच्या कुटुंबीयांच्या हाती मुलाऐवजी मुलगी देण्यात आल्याने संताप व्यक्त केला गेला. नातेवाइकांनी थेट ठिय्या दिल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने कठोर कारवाईचे आदेश देत समिती गठीत केली होती.
चौकशी समितीच्या अहवालानंतर, निष्काळजीपणे सेवा बजावणा-या १३ जणांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचा-यांना तडकाफडकी सेवामुक्त करण्यात आले असून, कायम व आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी संबधितांकडे पाठविला आहे. जन्मत:च अन्ननलिकेला इजा असलेल्या मुलीवर खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली असून, तिला जीवदान मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात शासकीय दस्तऐवजात नोंदी घेताना कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचाºयांनी प्रथमदर्शनी कसूर केल्याचा उल्लेख केला आहे. समितीने बाळाच्या जन्माच्या वेळी करण्यात आलेल्या नोंदी, तसेच सीसीटीव्ही चित्रणासह अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली. अधिकारी व कर्मचा-यांचे जाबजबाब नोंदवून घेत गरोदर महिलेच्या ठिकठिकाणी काढलेल्या रिपोर्टची तपासणी केली. खासगी आणि सरकारी रुग्णालयातील सोनोग्राफी अहवाल सारखे असल्याचे स्पष्ट करीत समितीने शासकीय दस्तावेजात नोंदी घेताना कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचा-यांनी प्रथमदर्शनी कसूर केल्याचा ठपका समितीनो ठेवला आहे.
