तुषार रौंदळ,
सटाणा (प्रतिनिधी) : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या साल्हेर किल्ल्याच्या संवर्धनासाठी ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने भव्य स्वच्छता व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते खासदार डॉ. निलेश लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली हे अभियान रविवारी (दि. २८) साल्हेर किल्ल्यावर राबवले जाणार असून, इतिहास जतन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रभावी संगम या उपक्रमातून साधण्यात येणार आहे. साल्हेर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जिवंत साक्षीदार आहे. मुघलांविरुद्ध झालेल्या ऐतिहासिक साल्हेरच्या लढाईमुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. मात्र, वाढती पर्यटकांची गर्दी, प्लास्टिक कचरा आणि दुर्लक्षामुळे या ऐतिहासिक वारशाला धोका निर्माण होत असल्याने ‘आपला मावळा’ संघटनेने पुढाकार घेत ही व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
या स्वच्छता अभियानास आमदार जयंत पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. राज्याच्या विविध भागांतून शिवप्रेमी, युवक, पर्यावरणप्रेमी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. इतिहासाचे जतन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. या अभियानाची सुरुवात शनिवार (दि. २७) रोजी होणार असून, सायंकाळी खासदार डॉ. निलेश लंके यांच्यासह सुमारे ४०० ते ५०० शिवभक्त साल्हेर येथे मुक्कामी दाखल होणार आहेत. मुक्कामादरम्यान किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वावर चर्चा, स्वच्छता मोहिमेचे नियोजन, स्वयंसेवकांचे गट तयार करणे तसेच पर्यावरणपूरक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी ठीक ७ वाजता किल्ल्याच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे. किल्ल्यावरील प्लास्टिक व इतर कचऱ्याचे संकलन, घनकचरा वेगळा करणे, ऐतिहासिक वास्तूंना कोणतीही हानी न पोहोचवता स्वच्छता करणे, यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच पर्यटकांनी स्वच्छता राखावी, प्लास्टिकचा वापर टाळावा व ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे, यासाठी जनजागृतीपर संदेश व आवाहन करण्यात येणार आहे. या स्वच्छता व जनजागृती अभियानात शिवप्रेमी, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आपला मावळा’ संघटनेचे मयूर भोये, मधुकर भोये, शांताराम मोरे, नानाजी शिंदे, भास्कर बच्छाव, हिरामण भोये, सुकलाल शिंदे, योगेश पवार, सुरेश पवार, नामदेव पवार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.
साल्हेर किल्ल्याच्या माध्यमातून इतिहास, पर्यावरण आणि सामाजिक जाणीव यांचे भान जागवणारी ही मोहीम समाजासाठी दिशादर्शक ठरेल. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारसा जतनाची चळवळ अधिक बळकट होऊन पुढील पिढीसाठी आपला गौरवशाली इतिहास सुरक्षित राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
