अवकाळीमुळे एक हजार ५६३ घरांची पडझड तर सहा व्यक्तींचा मृत्यू!

२६०१ हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान

नाशिक (प्रतिनीधी): एप्रिल व मे महिन्यात पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांना अवकाळीने झोडपून काढले. गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व सरींनी दणका दिला. नांदगाव, बागलाण, देवळा, इगतपूरी, निफाड आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने एप्रिल ते जून याकाळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. पेठमध्ये एक हजार ४१३, सुरगाण्यात ९३१.८६, तर त्र्यंबकला २०६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यांच्या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस व मान्सूनपूर्व सरींमुळे दोन हजार ६०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ३० जनावरे गतप्राण झाली आहेत; तर एक हजार ५६३ घरांची अंशत: पडझड झाली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले असून, आर्थिक मदतीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

पावसाने कच्चा व पक्या घरांची पडझड झाली आहे. तब्बल दीड हजारांहून अधिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झालेल्या बाधितांना मदतीचा हात देण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे ६६ लाख ८८ हजार ५०० रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. याशिवाय वीज पडून शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी झाली आहे. त्यामध्ये १३ गायी-म्हशी, नऊ बैल, तीन वासरे, पाच शेळ्या व ४७५ कोबंड्यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!