सकल मराठा समाजाच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा!

राजकीय नेत्यांच्या घरासमोर आंदोलनाचा पवित्रा

सातपूर(प्रतिनिधी) : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाने सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या घरासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांना पोलीस प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा पाच दिवस उपोषण केले. गुरुवारी उपोषण स्थगित करत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेत नवनियुक्त खासदारांना आदेशित करावे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाची भूमिका घेत त्याची सुरुवात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
देशातील सर्वोच्च नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण संदर्भातली स्वत:ची व त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करून राज्यकर्त्यांना ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण देण्यास भाग पाडावे. आमच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने नोटीस काढून काहीही फरक पडणार नाही, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत.
– करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!