१८ हजार क्विंटल बियाणे, २१ हजार टन खतांची विक्री…
नाशिक (प्रतिनिधी): खरीप हंगामातील पेरण्यांसाठी शेती मशागतीला वेग आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला नसल्याने खरिपाच्या पेरण्यांची प्रतीक्षा आहे. खरिपासाठी १७ हजार ८५२ क्विंटल बियाणाची, तर २१ हजार टन खतांची विक्री झाली आहे. आठवडाभरात दमदार पाऊस झाला, तर पेरण्यांना प्रारंभ होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जातो. जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून, दुष्काळी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी पावसाचे माहेरघर असलेल्या तालुक्यांत मात्र पुरेसा पाऊस झालेला नाही.
मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात काही भाग सोडून दमदार हजेरी लावली असून, मृग नक्षाच्या पावसाचे आगमन झाल्याने शेतीकामांना आतापासूनच वेग आला. शेतीची मशागत करून खरिपाच्या पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू आहे. ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्या भागात पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर झालेला नसल्याने शेतक-यांना दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे. गेल्या वर्षी सहा लाख २६ हजार १९० हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ होण्याची शक्यता आहे.
२१ हजार टन खत बांधावर
जिल्ह्यात सहा लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित करण्यात आले. खरीप हंगामासाठी दोन लाख २० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले. यात युरिया ७६ हजार ९०० मेट्रिक टन, डीएपी १८ हजार ३०० मेट्रिक टन, तर एसएसपीच्या २६ हजार ५०० मेट्रिक टनांचा समावेश आहे. यापैकी जूनअखेर एक लाख ४७ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध होणे अपेक्षित होते. यातील ९४ हजार ५२३ मेट्रिक टन खतसाठा प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत गेल्या वर्षीचा शिल्लक एक लाख ८१ हजार ४२६ मेट्रिक टन असा एकूण दोन लाख ७५ हजार ९४९ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक आहे.
५६ हजार क्विंटल बियाणाचा पुरवठा
७१ हजार २४३ क्विंटल बियाणाची मागणी कृषी विभागाने केली होती. त्यापैकी आतापर्यंत ५६ हजार ३५० क्विंटल बियाणाचा पुरवठा झाला आहे. यातील १७ हजार ८५२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. यात कपाशीचे सहा हजार ५००, भाताचे आठ हजार २७६, बाजरीच्या ९५० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.
