सरकार आल्यानंतर प्रशासकांच्या काळातील कारभाराची चौकशी; आ. आदित्य ठाकरे 

नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीनंतर हादरून गेलेले सत्ताधारी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहेत. यामुळेच निवडणुका पुढे ढकलत असून, गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकांच्या माध्यमातून सत्ताधारी प्रत्येक शहराची लूट करत असल्याचा आरोप करत प्रशासकांच्या काळात झालेल्या कारभाराची चौकशी आपले सरकार करेल, असे युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाच्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ या अभियानाची सुरूवात बुधवारी (दि. २१) नाशिकमधून झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. आ. ठाकरे यांनी आपल्या भाषणात सत्ताधा-यांचा घटनाबाह्य सरकार असा उल्लेख केला. ते म्हणाले, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन महिन्यापासून या सरकारला लाडकी बहीण आठवली. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराकडे सरकारने दुर्लक्ष केले. राज्यात महाआघाडीचे आपले सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू ठेवून त्यात अधिकचे काय देता येईल, ते तर देणारच परंतु, महिलांना सुरक्षा पुरवणार असल्याचा शब्द आदित्य ठाकरे यांनी दिला. नाशिकला येताना अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि खड्डेच-खड्डे दिसल्याचे सांगत हेच तुमचे सरकार आणि प्रशासकाच्या माध्यमातून तुम्ही कामे करता का, असा प्रश्न करत या सरकारला दररोज केवळ ठेकेदारांच्या माध्यमातून काय मिळेल, याची प्रतिक्षा असल्याची टीका त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा आणि मुंबई-अहमदाबाद या महामार्गांची अवस्था पाहावी, असे आवाहनही आ. ठाकरे यांनी केले.
व्यासपीठावर ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप, माजी महापौर विनायक पांडे, डी. जी. सुर्यवंशी, दीपक दातीर, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त करताना विधानसभेसाठी नाशिकमधील १५ पैकी आठ ते दहा जागा आपल्याला मिळाव्या, अशी मागणी केली.
लाठीचार्ज करणारे जनरल डायर कोण?
मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर असो की, कालच्या बदलापूर येथील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे महायुतीच्या सरकारमधील जनरल डायर कोण? असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्या जनरल डायरचा आम्ही शोध लावणार असल्याचे आ. आदित्य ठाकरे यांनी सांगितले. बदलापूर येथे आंदोलक स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरले होते. असे असताना निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करणारे हे सरकार खाली खेचा असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक दत्तक पुन्हा चर्चेत
नाशिक दत्तक घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या सरकारने शहराचा विकास केला का, असा प्रश्न करत नाशिकमधील अस्वच्छता आणि रस्त्यांच्या दुर्दशेकडे तसेच प्रशासकांच्या काळात सुरू असलेल्या कारभाराकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!