शिक्षिकेने दिली होती मयत गगन कोकाटेच्या खुनाची सुपारी; पाच संशयित ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): रात्रशाळेतील शिक्षिकेने सुपारी देऊन एका युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि. २०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास मेरी परिसरात घडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून याप्रकरणी शिक्षिकेसह चार संशयितांना ताब्यात घेतले असून, यात दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गगन कोकाटे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत शशिकांत रणदिवे (वय २०, रा. रो-हाउस नं. ३, राधाकृष्णनगर, बोरकर व्हॅली, अशोकनगर, सातपूर), मेहफूज रशीद सैयद (वय १८), रितेश दिलीप सपकाळे (वय २०, दोघेही रा. पाण्याच्या टाकीसमोर, बोरकल व्हॅली चौकीजवळ, अशोकनगर, सातपूर), गौतम सुनील दुसाने (वय १८, रा. शहीद सर्कल, गंगापूर वाइनच्या मागे, गंगापूर रोड, नाशिक) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सीबीएस परिसरातील एका रात्रशाळेतील शिक्षिकेचे चार ते पाच वर्षांपूर्वी गगन कोकाटे याच्यासोबत मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले; परंतु गेल्या वर्षभरापासून गगन कोकाटे शिक्षिकेला खूपच त्रास देत होता. हा त्रास अनावर झाल्याने या शिक्षिकेने ‘टायगर ग्रुप’चा सातपूरमधील अध्यक्ष संशयित संकेत रणदिवे यास २ लाख रुपयांना हत्येची सुपारी दिली. ठरल्यानुसार या शिक्षिकेने गगन कोकाटे यास मंगळवारी (दि. २०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नेहमीच्या मेरी परिसरातील मराठा समाज वसतिगृह समोरच्या मोकळ्या जागेत भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये बोलणे सुरू असताना, संशयित संकेत रणदिवे, मेहफूज सैयद, रितेश सपकाळे, गौतम दुसाने व अन्य दोघांनी गगन यास धक्का मारून भांडणाची कुरापत काढली व याच सुमारास या शिक्षिकेने पळ काढल्यानंतर संशयितांनी गगन कोकाटे याचा निर्घृणपणे खून करून घटनास्थळावरून आरोपी पसार झाले.
दरम्यान, बुधवारी (दि. २१) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही नागरिकांना मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पंचवटी पोलिसांना फोनवरून ही माहिती दिली. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. पंचवटी पोलीस ठाणे व युनिट एकच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत सातपूर परिसरातून घटनेतील सर्व संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास ज्योती आमने करीत आहेत.
या घटनेप्रकरणी गगन कोकाटे यांचे वडील प्रवीण कोकाटे यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित रात्रशाळा शिक्षिकेचा पती अभियंता आहे. शिक्षिकेला एक मुलगी व एक मुलगा आहे. काही दिवसांपासून गगन कोकाटे याने शिक्षिकेच्या मुलीस वाईटसाईट बोलून तिला त्रास देणे सुरू केले होते. सातपूर येथील टायगर ग्रुपचा अध्यक्ष संकेत रणदिवे याच्याशी संपर्क करून कट रचणा-या शिक्षिकेला गगन कोकाटे याने काही दिवसांपूवी त्र्यंबकेश्वर परिसरात नेऊन एका मंदिरात ‘कथित’ विवाह केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!