नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर घासलेटची कॅन ओतत आत्मदहनाचा प्रयत्न!

नाशिक (प्रतिनिधी): पोलिसांच्या छळास कंटाळून येथील सुवर्णकार दीपक दुसाने याने केलेल्या आत्महत्येस दोन वर्षे उलटूनही तपास संथगतीने सुरू असल्याची तक्रार करीत, मंगळवारी (दि.७) सुवर्णकार ओबीसी समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेत त्यांना ताब्यात घेतले.
दुसाने यांच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा घोडके यांनी निवेदनाद्वारे दिला होता. मंगळवारी ते घासलेटची कॅन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर पोहोचले. त्यांनी अंगावर घासलेट ओतून घेतले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन नंतर सोडून देण्यात आले. दुसाने यांच्या आत्महत्येबाबत पोलीस यंत्रणाच पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी घोडके यांनी केला. पोलिसांनी दुसाने यांच्याकडून तीन लाख ७० हजार रुपये खंडणीच्या स्वरूपात घेतले. नंतर बिटको चौकात त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. हा प्रकार सहन न झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी दुसाने यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या करताना चित्रफीत देखील तयार केली होती. हा धडधडीत पुरावा असताना पोलिसांचा केवळ कागदावर तपास सुरू आहे. यंत्रणाच चालढकल करीत असल्याचा आरोप घोडके यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!