नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यांमध्ये पाऊस अधिक आहे. तीन-चार दिवसांपासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात २४ तासांत १००.३ मिमी, तर सुरगाण्यात ६३ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी २१ व शहरात १५.३ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणातील जलसाठा ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये सलग तीन दिवस १०० मिमीहून अधिक पाऊस झाला, तर इगतपुरीत ४९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे आता जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली असून, एकूण जलसाठा २६.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील एकूण जलसाठा २३९० दशलक्ष घनफूटवर (४२.४५ टक्के) पोहोचला. तर बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास भावली धरण ओसंडून वाहू लागले. याच भागातील दारणा धरणात ७५ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे या धरणातून सकाळी ११०० क्यूसेकने केलेला विसर्ग सायंकाळी १८७४ क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर धरणातून बुधवारी सायंकाळी ६ वाजता ८०७ क्यूसेकने सुरू केलेला विसर्ग ७ वाजता १६१४ ने वाढवून २४२१ क्यूसेक करण्यात आला.
धरणांच्या जलसाठ्यात वाढजिल्ह्यातील लहान-मोठ्या १८ धरणांमध्ये सध्या २६ टक्के जलसाठा झाला आहे. गंगापूर धरणसमूहातील काश्यपीत १७ टक्के, गौतमी गोदावरीत ४२, आळंदीत सात टक्के साठा आहे. दारणा धरणात ७५ टक्के, मुकणेत २२, भावलीत १००, वालदेवी ३५, कडवात ६३ टक्के पाणी आहे. पालखेड धरणात १४, करंजवण २.२९, वाघाड ११, चणकापूर नऊ, हरणबारीत १४, केळझरमध्ये आठ, गिरणात ११, पुनदमध्ये ४० टक्के जलसाठा आहे; तर ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, माणिकपुंज, भोजापूर व नागासाक्या ही धरणे अजूनही कोरडीच आहेत.जिल्ह्यात सरासरी २१ मिमी पाऊसजिल्ह्यातील पाच तालुक्यांत जुलैमधील सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. यामध्ये त्र्यंबकेश्वरचाही समावेश आहे. दुष्काळी तालुका अशी ओळख असणाºया येवल्यात सरासरीच्या १४८ टक्के पाऊस झाला. दिंडोरीत १४१, चांदवडमध्ये १२०, नांदगावात ११० तर त्र्यंबकेश्वरमध्ये १०९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जुलैत १७४.४ मिमी पाऊस अपेक्षित असून, आतापर्यंत ७७.४ टक्के पाऊस झाला आहे.