नाशिक महापालिकेत पहिल्या टप्प्यात लिपिक, दप्तरी नाईक, शिपायांच्या बदल्या!

नाशिक (प्रतिनिधी) : महापालिकेत प्रशासन विभागाने कर्मचा-यांसह अधिका-यांच्या बदल्यांचे सत्र हाती घेतले आहे. त्यानुसार अनेक कर्मचा-यांना अचानक झालेल्या बदल्यांना सामोरे जावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत असून, प्रशासनाने पहिल्या टप्प्यात कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, दप्तरी नाईक व शिपाई या चार पदांच्या बदल्या केल्या आहेत. तर पुढील टप्प्यात वेगवेगळ्या संवर्गांतील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. गेल्या १० वर्षांपासून एकाच टेबलवर काम करणा-या कर्मचा-यांना बदल्यांना सामोरे जावे लागले आहे.
मनपाच्या आस्थापनेवर विविध संवर्गांतील ७०८२ पदे मंजूर आहेत. यापैकी सुमारे अडीच हजारांहून अधिक पदांच्या जागा सध्या रिक्त असल्याने मनुष्यबळाअभावी इतर कर्मचारी व अधिका-यांवर कामाचा ताण वाढलेला आहे. सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती तसेच काही कर्मचारी मयत झाल्याने मनपाचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. नाशिक मनपाचा प्रशासकीय खर्चाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने शासनाकडून नवीन नोकर भरतीला परवानगी दिली जात नाही. मागील वर्षी आस्थापना खर्चाची अट शिथील करून भरतीकरता परवानगी दिली मात्र मनपा प्रशासनाकडून भरती प्रक्रियाच वेळेत राबविली गेली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागातील ३४८, वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग पुन्हा बंद झाला आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीमार्फत अ, ब आणि क संवर्गातील पदे भरण्याची घोषणा केल्याने मनपाच्या भरतीला ओहोटी लागली आहे. नोकर भरती होत नसल्याने आहे त्या कर्मचा-यांना कमी मनुष्यबळात काम करावे लागत आहे. त्यात आता प्रशासनाने दहा वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांची अन्य ठिकाणी बदली करून एकप्रकारे संबंधित कर्मचा-यांची मक्तेदारी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. काही कर्मचाºयांनी तर पदोन्नती घेत पुन्हा आपल्याच पहिल्या ठिकाणी ठाण मांडले आहे. त्यामुळे प्रशासन विभागाने बदल्यांची कार्यवाही गुप्त ठेवत अनेकांना बदल्यांबाबत धक्का दिला आहे.
येत्या आठवडाभरात अन्य विविध संवर्गांतील बदल्या देखील होणार आहेत. महापालिकेतील नगररचना, बांधकाम, मिळकत तसेच वैद्यकीय असे काही विभाग आहेत, जे नेहमीच चर्चेत असतात आणि त्याठिकाणी टेबल मिळावा म्हणून अनेकांकडून प्रयत्न केले जातात. यामुळे या मलईदार विभागात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणा-यांना सहसा कोणी हातही लावत नाही. यामुळे आता सुरू असलेल्या बदलीसत्रात संबंधित विभागातील मक्तेदारी निर्माण झालेल्या कर्मचा-यांच्या बदल्या कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!