नाशिक (प्रतिनिधी): महिला सशक्तीकरण अभियानअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या प्रचार व प्रसाराच्या दृष्टीने राज्य शासनाने मागील आठवड्यात नाशिकमध्ये महिलांचे महामेळावा आयोजित केले होते. या मेळाव्याला महिलांच्या प्रवासाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात आली होती आणि त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपविली होती. महिलांच्या प्रवासाकरता जिल्हा प्रशासनाने सिटीलिंकमार्फत २०० बसेसची व्यवस्था केली होती. त्यानुसार या बसेसच्या भाडेशुल्कापोटी सिटीलिंकने ३४ लाखांचे देयक जिल्हा प्रशासनाला सादर केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियानअंतर्गत महामेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी ५० हजार महिलांची गर्दी जमविण्याचे उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार महिलांची ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बसेसची व्यवस्था केली होती. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरासह परिसरातील महिलांची वाहतूक करण्याकरता प्रशासनाने महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्याची सूचना दिली होती. या सुचनेच्या अनुषंगाने सिटी बसेसच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक विभागातील आठ ते दहा ठिकाणांहून महिलांना कार्यक्रमस्थळी नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सिटीलिंकने आपल्या २५० पैकी २०० बसेस राज्य शासनाच्या महिला महामेळाव्याकरता उपलब्ध करून दिल्या होत्या. या बसेसच्या प्रवाशी भाडे शुल्कापोटी आता सिटीलिंकने जिल्हा प्रशासनाला वाहतूक खर्चापोटी ३४ लाखांचे देयक सादर केले आहे. यामुळे सिटीलिंकच्या तिजोरीत हे पडल्यास शहर बससेवेला काहीसा का होईना आर्थिक हातभार लागणार आहे.