नाशिक (प्रतिनिधी): सलग तिसºया दिवशी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरु असल्याने रविवारीही गंगापूर, दारणासह एकूण १० धरणांमधून विसर्ग करावा लागला. गंगापूर धरणातील विसर्ग आणि शहरात सुरू असणा-या पावसाने गोदावरी नदीची पाणी पातळी पुन्हा वाढली आहे. जिल्ह्यातील सुरगाणा, पेठसह त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवार (दि.२७) पर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून गोदावरी आणि दारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात तीन – चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी दिवसभर जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये १५ तालुक्यांमध्ये सरासरी ३६.३ मिमी पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यात २४ तासांमध्ये विक्रमी १४१ मिमी पाऊस पडला. पेठमध्ये ९८ मिमी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८८.७ मिमी पाऊस झाला आहे. दिंडोरीत ६८.५ तर इगतपुरीत ६४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू राहिल्याने अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे.