जायकवाडीसाठी 20 टीएमसी पाणी नाशिकमधून पोहचले!

नाशिक (प्रतिनिधी): १ जूनपासून आतापर्यंत नाशिकमधून २०, तर नगरमधून ८ असा एकूण २८ टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीसाठी झाला आहे. यामुळे जायकवाडीचा जलसाठा ३८.१० टक्के झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीत अवघा ३३.६६ टक्के पाणी साठा होता. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक, नगर जिल्ह्यासह पैठण तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जायकवाडी धरणामध्येदेखील पाण्याची वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणा-या जायकवाडी धरणातदेखील पाण्याची आवक २७ हजार ५६२ क्यूसेकने सुरू आहे.
नाशिकसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पैठणसह नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारीदेखील जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रातदेखील मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला असून, गंगापूरसह इतर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, हे पाणी गोदावरी पात्रातून जायकवाडी धरणात येत आहे. त्यातच जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून शनिवारी (दि.२४) रात्री ९ वाजता ८४२८ क्यूसेक, गौतमी-गोदावरीतून २५६०, दारणातून १४,६७४ व सर्वांचा संकलित म्हणून नांदूरमध्यमेश्वरमधून ५२३०८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सध्या नाशिकच्या २३ प्रमुख प्रकल्पांमध्ये एकूण ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
जायकवाडीत सध्या ३९ टक्के म्हणजे २८ टीएमसी इतका जिवंत पाणीसाठा आहे; परंतु अद्यापही नाशिक-नगरची चिंता दूर झालेली नाही. किमान ६५ टक्के साठा पैठण जलाशयात उपलब्ध झाला, तरच वरच्या धरणांतून पाणी सोडण्याची आवश्यकता राहणार नाही, अन्यथा पाणी सोडावे लागेल, असे शासनाचेच आदेश आहेत. दिलासा इतकाच की, पुढील दोन ते तीन दिवस नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने सध्या सुरू असलेल्या विसर्गात वाढ होण्याच्या अंदाजामुळे जायकवाडी पुढील आठवडाभरात ५० टक्के भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तर सप्टेंबरमध्येही चांगला पाऊस झाल्यास जायकवाडी धरणात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!