जाणून घ्या सायको पॅथी व्यक्तिमत्व म्हणजे काय?

पण आपल्या अनेक लेखानमधून मानवी स्वभाव आणि वृत्ती, वागणूक याचा मानस शास्त्राशी कसा संबंध आहे हे समजावून घेत असतो. या लेखामार्फत आपण सायको पॅथी व्यक्ती कशी असते? त्याच्या स्वभावात कोणते दुर्गुण असतात, हि व्यक्ती कुटुंबात, समाजात कश्या पद्धतीने वावरते त्यामुळे त्या व्यक्तीला तसेच त्याच्या घरातील, संपर्कातील लोकांना काय काय अनुभव येतात, कश्या प्रकारे अनेक समस्या अडचणी त्यांच्या आयुष्यात उदभवतात या बद्दल जाणून घेणार आहोत.

या लोकांची काही प्रमुख लक्षण म्हणजे ते प्रचंड निगर गट्ट असतात. बेरडपणा, माणुसकीचा लावलेस नसलेले असे हे व्यक्तिमत्व असते. खोटे गोड बोलणे, खोटी स्तुती करणे, खोटं प्रेम दाखवणे, फूस लावणे यामध्ये हे लोकं पारंगत असतात.

शक्यतो अत्यंत मोठया प्रमाणात खोटं बोलण हा यांचा मूळ गुणधर्म असतो. दुसऱ्या ला समजावून घेणे, दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करणे, इतरांप्रती सदभावना अजिबात नसणे, स्वतः केलेल्या कोणत्याही चुकी बद्दल अपराधी भावना नसणे असा यांचा स्वभाव असतो.

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी हिंसा हाच मार्ग आहे अशी यांची धारणा असते. इतरांची मानसिक हिंसा, भावनिक हिंसा, शारीरिक हिंसा हे लोकं करतात. अनेकदा आपल्याला वाटते की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती ला मारणे, जखमी करणे, शारीरिक इजा पोहचवणे म्हणजेच हिंसा आहे परंतु भावनिक आणि मानसिक हिंसा काय आणि कशी असते याबद्दल आपल्याला कल्पना नसते. सायको पॅथी वृत्ती चे लोकं आपल्या घरातील, समाजातील लोकांची भावनिक दिशाभूल करून त्यांची मानसिक हिंसा करण्यात तरबेज असतात.

इतरांचा मानसिक छळ करण्याची वृत्ती अश्या व्यक्ती मध्ये आढळून येते. आपली चप्पल कुठे चावते हे जसं फक्त आपल्याला समजत असत इतरांना मात्र ती चप्पल अत्यंत आकर्षक, सुंदर, भारी दिसत असते. तस हे लोकं कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही अश्या प्रकारे लोकांचा मानसिक छळ करत असतात. वरवर पाहता सगळं अलबेल दाखवणार पण मनातून प्रचंड राग द्वेष सुडाची भावना बदल्याची आग यांच्या मनात असते.

या लोकांना कोणीही काहीही बोललं की लगेच राग येतो, त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली की हे स्वतःचा पवित्रा ताबडतोब बदलून समोरच्या वरच उलटा वार करतात. आपली चूक कोणाच्या लक्षात आली किंवा कोणीही त्यावर आवाज उठवला तर हे लोकं खूप संताप करतात किंवा खूप भावनांवश होवून इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि स्वतःला खरं सिद्ध करूनच राहतात.

आता अशी प्रवृत्ती किंवा असा स्वभाव का तयार होतो? किंवा हि वृत्ती कश्यामुळे जास्त वाढते याबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे. फॅमिली हिस्ट्री (कौटुंबिक इतिहास ) हा खूप मोठा भाग आहे ज्यामुळे सायको पॅथी वृत्तीचे व्यक्तिमत्व घडते. बायोलॉजिकल लेवल आणि बालपण अत्यंत चुकीच्या पद्धतीने गेलेले असणे, आई वडिलांनी लहानपणी खूप दुर्लक्ष केलेले असणे, स्वतःला मनमोकळे करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी लहानपणी कधीही संधी मिळालेली नसणे, लहानपणी यांच्या सोबत भावनिक, मानसिक पिळवणूक झालेली असणे. बाल वयात कोणीही यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक शोषण केलेले असणे यासारखी कारणे यामागे असतात.

ट्रीटमेंट ऑफ चाईल्ड बाय पेरेंट्स, गार्डीयन ऑर केअर टेकर हा खूप महत्वाचा मुद्धा असे व्यक्तिमत्व घडण्यास कारणीभूत असतो.
शक्यतो लहानपणी हि व्यक्ती कोणत्या वातावरणात लहानाची मोठी झाली, त्याचा परिसर, त्याचा शेजाऱ, त्याची शाळा, महाविद्यालय, संगत नातेवाईक मित्र मैत्रिणी कुटुंबातील लोकं ज्यांनी त्याला लहानच मोठं केला या सर्व गोष्टी व्यक्तिमत्व घडताना खूप महत्वाची भूमिका निभावत असतात.

संस्कारांची शिदोरी मिळण्यासाठी , मानसिकता घडण्यासाठी जे निरोगी वातावरण या व्यक्तींना मिळायला हवे ते मिळालेले नसते त्यातून त्यांचा खुनशी, त्रासदायक, इतरांशी दुश्मनी घेण्याचा, इतरांचं मानसिक खच्चीकरण करण्याची वृत्ती अधिक गडद होते.

या उलट बालपणी तरुणपणी त्यांना खूप डोक्यावर घेतलेले असणे, त्यांचा पुढे पुढे केलेले असणे, त्यांनी चूक केल्यास कायम त्यांची वकिली जवळच्या लोकांनी केलेली असणे, त्यांना सतत त्यांचं खरं करण्याची सवय कुटुंबापासून लागलेली असणे, त्यांना कोणीही कधीही विरोध केलेला नसणे, सतत अश्या लोकांची मन मर्जी इच्छा सांभाळून त्यांना शेफारून ठेवलेले असले तरी पुढे जावून हे लोकं सगळ्यांच्या कंट्रोल बाहेर जातात, मनमानी आणि हम करेसो कायदा अशी यांची वृत्ती तयार होते. यांच्या अनेक चुका सतत जवळचे लोकं झाकत जातात, काहीही करून या व्यक्तीला खुश ठेवायचं याच मन दुखलं नाही पाहिजे असं आंधळं प्रेम या व्यक्तीवर केल जात आणि त्यातून पुढे सायको पॅथीक व्यक्तिमत्व उदयाला येते.

इतर सर्वसाधारण लोकांसारखे हे लोकं वागू शकत नाहीत कारण इतरांशी त्यांची सायकोलॉजिकल रिऍलिटी जुळत नाही आणि ते असाधारण अबनॉर्मल व्यक्तिमत्व म्हणून जगायला सुरुवात करतात.
अत्यंत उद्धट, अप्रामाणिक बेजबाबदार असे या लोकांचे व्यक्तिमत्व असते आणि याबद्दल त्यांना कोणताही पच्छाताप नसतो. सुपर फेशियल चार्म म्हणजेच सर्व भावना, फीलिंग हे लोकं वरवर दाखवत असतात. मनापासून कोणाबद्दल काहीही नसते. या लोकांची स्वतः बद्दल असलेली इमेज, कल्पना खूप जगवेगळी असते. इतरांना ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात, विचित्र वाटतात त्या गोष्टी या लोकांना बरोबर आणि योग्य वाटतात. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी हे लोकं इतरांची सतत भावनिक पिळवणूक करत राहतात. यांच्या मध्ये इतरांप्रति आदर प्रेम जिव्हाळा आपुलकी दया अजिबात नसते. यांच्या मुळे कोणी कितीही दुखावलं गेले तरी त्यांना वाईट वाटतं नाही, फरक पडत नाही.

हे लोकं स्वतःच्या चुकांची कधीच जबाबदारी घेत नाहीत. स्वतःच्या चुकासाठी हजारो कारण हि लोकं देतात आणि ती कारण सुद्धा चुकीचीच असतात. कायम आपण केलेली चूक अथवा चुका कश्या योग्य आहेत हे ते समोरच्याला पटवून देतात आणि समोरील व्यक्तीला निरुत्तर करतात. अत्यंत बेजबाबदार पणे हे लोकं आयुष्य जगत असतात. भविष्याचा, इतरांचा, पुढचा मागचा कोणताही विचार, नियोजन हे लोकं करत नाहीत. मोठया मोठया रिस्क म्हणजेच जोखीम हे लोकं वारंवार घेतात. अनेकदा चुकांचे गंभीर परिणाम भोगून पण हे लोकं स्वतःला बदलत नाहीत, कोणाचं ऐकून स्वतःच्या वृत्ती मध्ये बदल करत नाहीत. कितीही मोठया रिस्क घेतांना ते परिणामांचा अजिबात विचार करत नाहीत. थ्रीलिंग, रिस्की, जगावेगळ्या गोष्टी करण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. सर्वसामान्य आयुष्य, समाजात इतर लोकं जे आयुष्य जगतात, जे वागतात, बोलतात त्याच्या खूप पलीकडे हे लोकं गेलेले असतात. आपण स्वतः अश्या व्यक्तिमत्वत बसत नाही ना? हे वेळोवेळी स्वतःला विचारणं आवश्यक आहे. आपल्या घरातील, समाजातील, नात्यातील, ओळखीतील कोणीही अश्या स्वभावाचे लक्षण दाखवत असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीला यातून बाहेर पडायला मदत करणे, त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे कारण सायको पॅथी हा पुढे जावून खूप मोठा मानसिक आजार बनू शकतो आणि सगळ्यासाठी तो त्रासदायक होवू शकतो. या व्यक्ती तर स्वतःला बदलायला कधीच तयार नसतात अश्या वेळी स्वतःला अश्या लोकांपासून लांब ठेवणं, सुरक्षित ठेवणं सुद्धा आवश्यक आहे अन्यथा आपली मानसिक भावनिक स्थिती प्रचंड खराब होते आणि विनाकारण आपण सुद्धा स्वतःच खच्चीकरण करून घेतो, आपला आत्मविश्वास गमावून बसतो.

मीनाक्षी जगदाळे, समुपदेशीका
संपर्क: 9766863443

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!