महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या प्रयत्नांना यश
नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरतर्फे व्यापारी व औद्योगिक दृष्टीकोनातून देशातील व राज्यातील महत्त्वाची शहरे विमानसेवेद्वारे जोडली जावीत, यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या एव्हिएशन समितीचे काम सुरू आहे. यासंदर्भात चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय सोनवणे, एव्हिएशन समितीचे मनीष रावल यांनी ना. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याचे फलित म्हणून दि. १० सप्टेंबरपासून इंडिगो कंपनीतर्फे नाशिक ते बंगळुरू विमानसेवा नियमित सुरू होणार आहे.
नाशिक-बंगळुरू विमानसेवा सुरू झाल्यास नाशिकच्या व्यापार, उद्योग वाढीस याचा फायदा होणार आहे. आयटी उद्योगांच्या दृष्टीने ही विमानसेवा फायदेशीर ठरेल. याशिवाय भारतातील इतरही महत्त्वाच्या शहरांना नाशिकहून थेट विमानसेवेद्वारे जोडण्यासाठी व गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक यांसह विविध राज्यांमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधून विमानसेवा सुरू करण्याची मागणीही समितीने केली होती. त्यानुसार नाशिक ते दिल्ली व जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे.
नाशिक-बंगळुरू विमानसेवा सुरू महाराष्ट्र चेंबरच्या पाठपुराव्यास यश आल्याने नाशिककर उद्योजक, व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या सेवेसाठी उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, उपाध्यक्ष संजय सोनवणे, शाखा चेअरमन अंजु सिंघल, कार्यकारिणी सदस्य मनीष रावल यांनी विशेष प्रयत्न केले.

