विनयभंग प्रकरणी दोघांना चार वर्षे कारावासाची शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): रस्त्याने पायी जाणा-या युवतीची वाट अडवित विनयभंग करणा-या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. आडगाव नाका भागात २०१७ मध्ये घडलेल्या या विनयंभ प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र शार्दुल भायानी (वय ३१ रा. सिध्दी विनायक अपा. औरंगाबादरोड) व महेश प्रकाश कैचे (वय ३५, रा.पंचवटी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिडीता दि. २३ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास पंचवटी बस डेपोकडून आडगाव नाक्याच्या दिशेने जात असताना दुचाकीवर डबलसीट आलेल्या दोघांनी श्रीकृष्ण प्लाझा शॉपिंग सेंटर भागात तरुणीची वाट अडवित विनयभंग केला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जमादार ए. एम. सरोदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात पुराव्यानिशी दोषारोप पत्र सादर केले. हा खटला कोर्ट क्र. ८ च्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयासमोर चालला. सरकारतर्फे अ‍ॅड. एस. एस. चितळकर यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून दोघांना दोषी ठरवत प्रत्येकी चार वर्ष कारावास व १२ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!