आता प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करणा-यांवर कारवाई!

नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या वतीने प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करणा-यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून, त्यात फाळके स्मारक परिसरातील एका मूर्ती बनविणा-यावर बुधवारी (दि. ३) कारवाई करण्यात आली. या कारवाईत मनपाने प्लास्टर ऑफ पॅरिस व इतर साहित्य जप्त केले आहे.
केंद्र शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी जाहीर केली आहे. तसेच, ही बंदी कायम असून, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती निर्मिती व आयात करणे, त्याचा साठा करण्यास बंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांच्या आदेशानुसार सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी याबाबत मोहीम हाती घेतली. यात बुधवारी (दि. ३) फाळके स्मारक भागात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून मूर्ती बनविणारा अर्जुन राठोड यावर कारवाई करण्यात आली. त्यात चार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गोण्या, दोन ड्रम्स, तीन प्लॅटफॉर्म्स, १० बांबू, पाच लाकडी पट्ट्या असे साहित्य जप्त करण्यात आले.
नाशिक महापालिकेच्या वतीने पीओपी वापरावर बंदीबाबत जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी त्याबाबत दक्षता घ्यावी, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती अथवा त्या अनुषंगिक साहित्य बनविणा-यांवर महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली असून, ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पर्यावरण विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!