‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’या संस्थांचा फायदा शेतक-यांना कमी!

  • केंद्राच्या कांदा खरेदी प्रक्रियेत आता होणार बदल!
  • शेतक-यांच्या प्रस्तावाला केंद्रीय पथकाची सहमती; कृषी मंत्रालयाला पाठवणार अहवाल
नाशिक (प्रतिनिधी): कांदा उत्पादक शेतक-यांना जास्त भाव मिळावा या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या संस्था शेतक-यांऐवजी व्यापायांकडूनच जास्त कांद्याची खरेदी करतात. सद्य:स्थितीत शेतक-यांकडून १५ ते २० रुपये किलो दराने खरेदी केलेला कांदा आता व्यापारी ३० रुपयांनी विकत आहेत. त्यामुळे या दोन संस्थांचा फायदा शेतक-यांपेक्षा व्यापा-यांनाच होत असल्याने कांदा खरेदीच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव शेतक-यांनी केंद्र सरकारच्या पथकासमोर ठेवला. शेतक-यांच्या सूचनांप्रमाणे कांदा खरेदी प्रक्रियेत बदल केले जातील. त्यासाठी यासंदर्भातील अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयात सादर करण्याचे आश्‍वासन केंद्रीय पथक प्रमुख बी. के. पृष्टी यांनी दिले.
केंद्र्रीय कृषी मंत्रालयाचे पथक दोन दिवसांपासून नाशिक दौ-यावर आहे. जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रतिनिधींसोबत बुधवारी (दि. ३) दुपारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांची बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय विपणन व तपासणी संचालनालयाचे उपकृषी पणन सल्लागार बी. के. पृष्टी, किमान किंमत समर्थन उपायुक्त बिनोद गिरी, फलोत्पादन (सांख्यिकी) उपसंचालक पंकज कुमार, विपणन व तपासणी संचालनालयाच्या विपणन अधिकारी सोनाली बागडे आदी उपस्थित होते.
‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन संस्थांमार्फत यंदा पाच लाख टन कांद्याची खरेदी होणार आहे. कांदा खरेदी करताना फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रतिनिधींना प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. परंतु, ठरावीक कंपन्यांकडूनच कांद्याची खरेदी होते. शेतक-यांच्या नावे पैसेही काढले जातात. एका शेतक ºयाच्या नावे दहा ते वीस लाख रुपयांपर्यंत पैसे वर्ग झाल्याचे या कंपनी प्रतिनिधींनी पथकासमोर सांगितले.
एका व्यक्तीने कांदे नाफेडला दिले, तर पैसे त्यांच्या भावाच्या खात्यावर वर्ग झाले. पैसे मिळाल्याची पावती पहिल्या भावाच्या नावावर आल्याचे पुरावे गणेश निंबाळकर यांनी केंद्रीय पथकासमोर सादर केले. त्यामुळे कांदा खरेदीच्या पद्धतीत जास्तीत जास्त पारदर्शकता येण्यासाठी त्यात बदल करण्याची सूचना शेतक-यांनी मांडली. या सूचनांप्रमाणे केंद्रीय कृषी मंत्रालयास समितीमार्फत अहवाल सादर केला जाईल, असे सांगत जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खरेदीत सहभागी होण्याचे आवाहन विपणन अधिकारी सोनाली बागडे यांनी उपस्थितांना केले.
यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे गणेश निंबाळकर, पंडित वाघ, युवा मित्र संघटनेचे नितीन अढांगळे, शांताराम बागूल, भाऊसाहेब गांगुर्डे, मधुकर वाळुंज, अमोल खलाटे, मल्हारी जाधव, दगू चव्हाणके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!