नोकरीच्या आमिषाने ६२ जणांना सहा कोटींचा गंडा; बेरोजगारांनी घेतली पोलिसांत धाव!

नाशिक (प्रतिनिधी) : रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील तब्बल ६२ जणांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत चार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली असून, पैसे भरून तीन ते चार वर्षे उलटूनही नोकरी न लागल्याने बेरोजगारांनी पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमण सिंह उर्फ विशाल सिंह (रा. कोलकाता), निरज सिंह (रा. टाटानगर, झारखंड), ऋतुराज पाटील उर्फ हेमंत हनुमंत पाटील (रा. येडे मच्छींद्र, सांगली), राजेश सिंघ (कोलकाता), अंशुमन प्रसाद, संदीप सिंह (दोघे रा. रांची, झारखंड) व जैद अली (रा. वाशी, मुंबई) अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत जिम ट्रेनर वीरेश राजेश वाबळे (रा. श्रीरामनगर, लोखंडे मळा, जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी संशयित रमण सिंह याने वाबळे यांच्याशी संपर्क साधला होता. घरोब्याचे संबंध असलेले शैलेंद्र महिरे यांच्या माध्यमातून ही ओळख झाली होती. महिरे यांच्या मुलास रेल्वेत नोकरी लावल्याचे भासविल्याने वाबळे यांनी पत्नीस नोकरीस लावण्याची इच्छा व्यक्त केल्याने ही फसवणूक झाली.
रेल्वेत नोकरी लावून देण्याची ग्वाही देत भामट्यांनी वाबळे यांच्याकडून प्रथम आठ लाख रुपये घेतले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरीत कायम करण्याच्या मोबदल्यात वाबळे यांच्याकडून ११ लाख रुपये वसूल करण्यात आले. दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करूनही नोकरी न लागल्याने वाबळे यांनी चौकशी केली असता, संशयितांनी ६२ जणांची फसवणूक केल्याचे पुढे आले. संशयितांनी बेरोजगारांना सहा कोटी दोन लाख ३२ हजार रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत तक्रारदारांनी उपनगर पोलिसांत धाव घेतल्याने वाबळे यांच्या तक्रारीवरून एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक किशोर कोल्हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!