आज नाशकातील पोलिसांच्या सतर्कतेने निवळले तणावपूर्ण वातावरण

नाशिक (प्रत‍िनिधी): जातीवादाला खतपानी घलणाऱ्या अक्षेपार्ह पत्रकामुळे नाश‍िकमध्ये तणावाची पर‍िस्थिती निर्माण झाल्याने पंचवटी परिसरात शांतता पसरली होती. निमाणी बस स्थानकासमोरील परिसरात शनिवारी (दि.२२) पहाटेच्या सुमारास एका समाजघटकाविषयी आक्षेपार्ह मजकूर छापलेली पत्रके घरांबाहेर टाकण्यात आल्याने पंचवटी परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी तत्काळ कार्यवाही केल्याने व परिस्थिती सुयोग्य तऱ्हेने हाताळल्याने तणाव निवळला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित अमोल चंद्रकांत सोनवणे यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजात तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पत्रके टाकण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पंचवटी परिसरात पसरली. त्यानंतर १०० ते १५० नागरिकांनी पंचवटी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. हे कृत्य करणाऱ्या संशयितांचा तातडीने शोध घेऊन त्याला अटक करण्याच्या मागणी जमावाने केली. आक्रमक आंदोलकांनी घोषणाबाजी करीत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर दिंडोरी रोड येथे रस्ता रोको करण्यात आला. तसेच दिंडोरी नाका येथेही ठिय्या आंदोलन सुरू केले हे आंदोलन दिवसभर सुरू होते. त्यामुळे पंचवटी कारंजा, आडगाव नाका, दिंडोरी नाका, पेठ नाका, निमाणी येथील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. तसेच, या भागातील दुकानेही बंद करण्यात आली होती.

या प्रकारामागे, दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा उद्देश होता का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता राखावी. तसेच, या संदर्भातील अशा कोणत्याही आक्षेपार्ह व चुकीच्या पोस्ट्स सोशल मीडियावर टाकू नयेत, असे आवाहन करतानाच, असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशााराही पोलिसांनी दिला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण, माजी महापौर अशोक दिवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, तसेच आरपीआय आठवले गटाचे प्रकाश लोंढे, अर्जुन पगारे, आरपीआयचे (कवाडे गट) शशी उन्हवणे, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, बहुजन समाज पार्टी, भीम ब्रिगेडचे कविता पवार, रवींद्र्र दोंदे, शंकर हिरे, नीलेश आल्हाटे, दिनेश उन्हवणे, माजी आमदार वसंत गिते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, किशोर घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून संतप्त आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. सेवानिवृत्त सहायक पोलीस उपायुक्त दिनेश बर्डेकर यांनी हे प्रकरण हाताळताना आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत, शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. याकरिता मध्यस्थीची भूमिका बजावली. त्यांच्या या मध्यस्थीला यश आल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!