नाशिक (प्रतिनिधी): महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना व्यापक दृष्टीकोन ठेवून सक्षमतेने राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांची माहिती संलग्नित महाविद्यालयांतील प्रतिनिधींना देण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी, तर प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाय. प्रवीणकुमार, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. देवेंद्र पाटील, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कानिटकर म्हणाल्या की, विद्यार्थी हा केंद्रबिंदु मानून विद्यापीठाने अनेक विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत पारंपरिक योजनांबरोबर अनेक संशोधनांसाठी उपयुक्त ठरतील, अशा उपक्रमांना प्रारंभ केला आहे. यामध्ये अधिक पारदर्शकता असावी यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संलग्नित महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नवे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, योजनांची माहिती नसल्याने गरजू विद्यार्थी योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यांना हा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे कानिटकर म्हणाल्या. डॉ. मिलिंद निकुंभ यांनी, विद्यापीठाच्या विविध योजना व उपक्रमांविषयी विद्यार्थ्यामध्ये संवेदशीलता जागृत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थी कल्याणकारी योजनांचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी राज्यातील विभागीय स्तरावर मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात याव्यात, असेही ते म्हणाले. महाविद्यालयांनी विद्यार्थी व विद्यापीठ यांच्यामधील समन्वय अधिक विकसित करणे गरजेचे असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल, असे मत डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी विद्यापीठाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. या कार्यशाळेत सी-डॅक युनिटच्या प्रतिनिधी अनुपमा गायकवाड यांनी आॅनलाइन बोर्डिंग सॉफ्टवेअरसंदर्भात विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

