रविवारी पाडुरंगाच्या चरणी पोहोचणार सायकल वारी!

नाशिक (प्रतिनिधी): विठ्ठल नामाचा जयघोष करत आषाढी एकादशीनिमित्ताने त्र्यंबकेश्वर येथून संत निवृतीनाथ महाराजांची दिंडी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यानंतर आता नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे सायकलपटू देखील नाशिक ते पंढरपूर अशी ३५० किमीची सायकल वारी करणार आहे. शुक्रवारी (दि. ५) नाशिकहून सायकलवारी प्रस्तान करणार असून रविवारी (दि. ७) पंढरपुरमध्ये पोहचणार आहे. वारीत ३०० सायकलिस्ट्स सहभागी होणार असून ते व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे.
‘अमली पदार्थांचे सेवन टाळा, निरोगी आयुष्य जगा…, सायकल चालवा, निरोगी राहा व पर्यावरण संवर्धन करा’ हा संदेश घेऊन सायकलिस्ट्स पंढरपूरकडे रवाना होत आहेत. या प्रवासादरम्यान नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची टीम मार्गात गावागावांत पथनाट्याद्वारे जनजागृती करणार आहे व पांडुरंगाच्या चरणी व्यसनमुक्त भारतासाठी साकडे घालणार आहे.
शुक्रवारी (दि. ५) सकाळी ६ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, नाशिक येथून विठ्ठल आरती करून वारीची सुरुवात होईल. यासाठी संचालक प्रवीण कोकाटे यांनी रथ साकारला आहे. सायकलवारी नाशिकरोड, सिन्नर, नांदूर शिंगोटे, नान्नज, लोणी, राहुरीमार्गे अहिल्यानगर (अहमदनगर) येथे १६० किलोमीटर अंतर पार करून सायकलिस्ट्स पोहोचतील. या ठिकाणी करीमभाई यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
दुस-या दिवशी शनिवारी (दि. ६) पहाटे ५ वाजता निघून सायकल वारी मिरजगाव, करमाळा, टेंभुर्णीमार्गे सायंकाळी पंढरपूर येथे भक्त निवासात पोहोचेल. मार्गात मिरजगाव, करकंब येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनीषा रौंदळ, संजय पवार, दीपक भोसले वारीचे नियोजन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!