नाशिक (प्रतिनिधी): शहरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूबाधित रुग्ण आढळून येत असल्याने वैद्यकीय विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. जून महिन्याच्या पहिल्या २४ दिवसांत जवळपास ९४ रुग्ण, तर मे महिन्यात ३३ रुग्ण सापडले आहेत. तब्बल तिप्पट रुग्ण सापडले असून, या सरकारी आकडेवारीपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया डेंग्यू रुग्णांची संख्या मोठी असू शकते.
मनपाच्या मलेरिया विभागातर्फे शहरातील प्रमुख बिल्डर्स, उद्योजकांच्या संघटना पदाधिका-यांच्या बैठका घेत डेंग्यूची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एवढेच नाही, तर एका घरामध्ये जितके उत्पत्ती स्थळे सापडतील त्यांना प्रति उत्पत्ती स्थळ २०० रुपये दंड करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर तसेच अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत क्रेडाई, निमा, आयएमए अशा विविध संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते. इमारती, औद्योगिक प्रकल्पांच्या तळघरांमध्ये वाहनतळाच्या क्षेत्रामध्ये किंवा बेसमेंटमध्ये पाण्याचे उघडे साठे आढळून आल्यास पाच ते दहा हजारांपर्यंत दंड केला जाणार आहे. यंदा असह्य उकाडा असल्याने कुलर व फ्रिजचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यामुळे या दोन्ही उपकरणांमधील स्वच्छ पाण्यातून डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव झाल्यानेच रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र, आता कुलर व फ्रिजचा वापर कमी झाला असला तरी शहरात झालेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यातून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली आहे.
मनपाच्या औषध व धूरफवारणी करणा-या ठेकेदाराकडून कामाकडे कानाडोळा केला जात असल्यानेच साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. महपालिका या ठेक्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. असे असताना शहरात प्रभावीपणे औषध व धूरफवारणी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. औषध व धूरफवारणी करताना २० एमएल केमिकल वापरणे गरजेचे असताना प्रत्यक्षात मात्र चार ते पाच एमएल औषध वापरले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.