नाशिक (प्रतिनिधी): सन २०२६-२७ साली होणा-या सिंहस्थ महापर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी मंगळवारी (दि. ७) पंचवटीतील विविध महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून अधिका-यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यामध्ये साधुग्राम परिसर, तपोवन परिसर, कुंभमेळा प्रशासकीय इमारत, सिटीलिंक बस डेपो, बेघर निवारा केंद्र, बटुक हनुमान मंदिर परिसर आणि नियोजित साधुग्राम जागेचा पाहणी केली.
आयुक्त खत्री यांनी पाहणीदरम्यान अतिक्रमण हटविण्याबाबत, तसेच स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांच्या उभारणीबाबत विविध सूचना दिल्या. यावेळी त्यांनी संबंधित विभागांना वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. सिंहस्थ महापर्वात देश-विदेशांतून लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. सिंहस्थ कुंभ महापर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वय साधत काम करावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, स्वच्छतेवर विशेष भर देत भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन, आरोग्य सेवा आदी क्षेत्रांत महत्त्वपूर्ण नियोजन सुरू आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना या दौ-यात संबंधित अधिका-यांना दिल्या. सिंहस्थ कुंभ महापर्वाच्या पूर्वतयारीसाठी महापालिका प्रशासन सज्ज असून, सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या समवेत रामकुंड परिसराची पाहणी केली. रामकुंड परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या व झालेल्या कामांची पाहणी करून, ही कामे जलदगतीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाक्रयिांना दिल्या. भाविकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्त खत्री यांनी सांगितले.
