नाशिक (प्रतिनिधी): प्राणघातक हल्याच्या गुह्यात तब्बल चार महिन्यांपासून फरार असलेला सराईतास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सामनगाव परिसरात केली असून संशयितास उपनगर पोलिसांकडे सोपविले आहे.
नीलेश शंकर शहा (वय २६, रा. सामनगाव रोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या ७ एप्रिल रोजी जेलरोड येथील साने गुरुजीनगर भागात ही घटना घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संशयित घटनेनंतर पसार झाला होता. गेली चार महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. संशयित शनिवारी (दि. २७) सामनगाव परिसरातील पॉलिटेक्निक कॉलेज भागात असल्याची माहिती मिळाल्याने युनिट २ च्या पथकाने सापळा लावून संशयिताच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विवेकानंद पाठक, अंमलदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, महेश खांडबहाले, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, प्रवीण वानखेडे आदींच्या पथकाने केली.