दंगल प्रकरणातील संशयितांना न्यायालयीन कोठडी

नाशिक (प्रतिनिधी) : सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी (दि. १६) जुने नाशिक परिसरात दोन गटामध्ये दगडफेक होऊन दंगलीची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांची ओळख पटवून रात्रीतून धरपकड केली. यातील रॅली काढून दंगल घडविणाºया ७ ते ८ जणांच्या एका दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात आणण्यात आले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. १६) जुने नाशिकमधून बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅली दरम्यान दोन गटात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर बडी दर्गा परिसरात दोन गटात दगडफेक झाली होती. परंतु पोलीसांची वेळीच आक्रमक भूमिका घेतली. तसेच, जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे दंगल आटोक्यात आली आणि सायंकाळी परिस्थिती नियंत्रणात आली होती. त्यानंतर पोलिसांनी बाईक रॅलीतील संशयितांची ओळख पटवून त्यांची धरपकड केली होती. यातील सात ते आठ संशयितांना न्यायालयाने शनिवारी (ता. १७) एका दिवसाची कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने या संशयितांना रविवारी (दि. १८) पुन्हा न्यायालयात आणण्यात आले. या संशयितांना न्यायालयात आणले जाणार असल्याने न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!