राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल: भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आले आहे. ‘टाइम्स’ने केलेला सर्व्हे हा दहा दिवसांपूर्वी केलेला असेल. त्या आधारावर जर तुम्ही कोणालाही बहुमत मिळणार नाही, असे दाखवत असाल, तर त्यात फारसे तथ्य नाही. कारण लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात आल्यानंतर आज सर्वत्र जल्लोष आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार, याची खात्री असल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले.
विधानसभेसाठी सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. अशातच टाइम्सने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात महायुती व महाविकास आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे भाकीत केले आहे. त्यात फारसे तथ्य नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘लाडकी बहीण’ योजनेवर आधी महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली. आता तेच सत्तेवर आल्यावर ३ हजार देऊ, असे म्हणत आहे. आज लाडकी बहीण योजनेमुळे जनतेमध्ये आनंद आहे. राज्य सरकारने शेतकरी किंवा विद्यार्थ्यांसाठी ज्या काही नवीन योजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर याचा परिणाम सकारात्मकरित्या महायुतीला होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार याची खात्री आपल्याला असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच ते यापुढे म्हणाले की, काल परवा ज्या दंगली झाल्या त्यात काही पोलीस बांधवदेखील जखमी झाले आहेत. यात दोन्हीकडच्या लोकांचे नुकसान झाले आहे. ही दंगल पोलिसांनी जीव धोक्यात घालून शमवली. दोन्ही समाजाचे प्रमुख एकत्र येत शांतता निर्माण करतात, अशी नाशिकची परंपरा आहे, असे भुजबळांनी म्हटले आहे. सर्व नागरिकांनी शांतता राखायला हवी. दंगलीचे शहर म्हणून जर नाशिक पुढे आले, तर प्रगती थांबेल. चांगले लोक जर पर्यटक म्हणून येत असतील, तर नाशिक शहर शांत ठेवले तर सर्वांचे पाऊल पुढे पडेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!