नाशिक (प्रतिनिधी): राज्यात ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने यानिमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील पहिल्या तीन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनुक्रमे पाच लाख, २.५ लाख व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकधिक मंडळांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. गणेशोत्सव स्पर्धेअंतगर्त भाग घेणा-या मंडळांपैकी मागील सलग २ वर्षे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे अधिकाधिक नवीन मंडळांना संधी मिळणार आहे.
गणेशोत्सव स्पर्धेसाठी शासनाने समिती गठीत केली आहे. विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हापातळी वर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय, शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. ही निवड समिती प्रत्यक्ष मंडळांना भेटी देतील. सदर जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून तीन विजेते क्रमांक निवडीसाठी राज्यस्तरीय समिती असेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ई-मेल आयडीवर ३१ ऑगस्ट परिपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुरस्कारांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन संवर्धन, राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय, राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्माकॉल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पारंपरिक,देशी खेळांच्या स्पर्धा व गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा आदी बाबींवर गणेशोत्सव मंडळांना गुणांकन दिले जाणार आहे.
