नाशिक शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढतेच!

केंद्रीय पथकाकडून नाशिकची आरोग्य तपासणी!

नाशिक (प्रतिनिधी): शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाइन फ्लू या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने त्याची गंभीर दखल केंद्र शासनाच्या मलेरिया विभागाने घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राच्या महाराष्ट्र गोवा व दीव-दमणच्या मलेरिया विभागाच्या केंद्रीय विभागीय संचालकांसह तीन सदस्यीय पथकाने नाशिकमध्ये पाहणी केली. या पाहणीत उंटवाडी येथील एका बांधकामाच्या ठिकाणी, तसेच संभाजी चौकातील एका इमारतीत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे शहरात औषध आणि धूरफवारणी केवळ नावालाच होत असल्याचे समोर आले आहे.
शहरातील डेंग्यू निर्मूलनासाठी लोकसहभागाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची सूचना केंद्रीय पथकाच्या विभागीय संचालक डॉ. सरिता सकपाळ यांनी मनपा वैद्यकीय, मलेरिया विभागाला दिल्या आहेत. नाशिकमध्ये स्वाइन फ्लू आणि आता डेंग्यूचाही उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये डेंग्यूचे रूग्ण आढळून येतात. मात्र, यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. शहरात गेल्या वर्षी तब्बल ११९१ डेंग्यूबाधित आढळून आले होते. त्यापैकी तीन जणांचा डिसेंबर २०२३ मध्ये डेंग्यूमुळे बळी गेला. गेल्या मे महिन्यात नियंत्रणात असलेल्या डेंग्यूचे जूनमध्ये रुग्ण आढळून आले. मे मध्ये रुग्णसंख्या ३९, तर जूनमध्ये १६१ झाल्याने नाशिक डेंजर झोनमध्ये गेले आहे. त्या पार्श्वभूमीवरच आढावा घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय विभागीय संचालक डॉ. सरिता सकपाळ, डॉ. अरविंद अलोने, किटकशास्त्रज्ज्ञ माने या तिघांचे पथक बुधवारी (दि. ३) नाशिकमध्ये दाखल झाले. या पथकाने गुरुवारी (दि. ४) शहरातील उंटवाडी, संभाजी चौकमधील काही घरांना भेटी दिल्या. या भेटीत त्यांना उंटवाडीतील एका बांधकामाच्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. तसेच, संभाजी चौकातील एका इमारतीत वॉचमनच्या रूमशेजारील कुंडीत डेंग्यूच्या अळ्या आढळल्या.
जानेवारीपासून आतापर्यंत एकूण २७१ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, गोविंद नगरमधील एका ७० वर्षीय रुग्णाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याचा अहवाल आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!