जीएसटी कायद्यातील सुधारणा करदात्यांना लाभदायक: संदीप हेडाऊ 

नाशिक (प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या ५३ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटी कायदयातील कलम १६ (४) मधील इनपुट टॅक्स क्रेडिट, कलम ७३ व ७४ अंतर्गत व्याज आणि दंड माफी, अँम्नेस्टी स्कीम इ. अशा विविध सवलतींचा व्यवसाय, उद्योजकांना फायदा व्हावा यासाठी जीएसटी कायदयात सरकार कडून होत असलेले बदल हे जीएसटी करदात्यांना लाभदायक, हिताचे असल्याचे सेंट्रल जीएसटी (ऑडिट) उपायुक्त संदीप हेडाऊ यांनी सांगितले यावेळी त्यांनी जीएसटी ऑडिट मध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी तसे हिशोब पत्रकांची पूर्तता, वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करून, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने ५३ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णयाबाबत कर सल्लागार, प्रॅक्टिशनर्स, ऍडव्होकेट, सीए तसेच व्यापारी वर्ग यांना याबाबत सखोल व अद्ययावत माहिती सोप्या भाषेत मिळावी याकरिता आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार प्रसंगी अध्यक्षीय भाषणात उपस्थितांशी  सवांद साधत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते पुणे येथील जीएसटी कायद्याचे अभ्यासक व तज्ञ सीए स्वप्नील मुनोत, सेंट्रल जीएसटी ऑडिटचे उपआयुक्त अवधेश शर्मा तसेच सर्व सहायक आयुक्त मनोहर वाघ, वसंत तुपलोंढे, अशोक सरकार आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते सीए स्वप्नील मुनोत यांनी ५३ व्या  जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतील महत्वाच्या मुद्यांचे विश्लेषण करताना सांगितले की, जीएसटी कौन्सिल च्या ५३ व्या बैठकीमध्ये सुचविण्यात आलेल्या बहुसंख्य तरतुदी व निर्णय याबाबत व्यापारी वर्ग, कर सल्लागारांनी माहिती घेणे आवश्यक आहे. कलम १६ (४) बाबत व्यापाऱ्यांना इनपुट कराचे मिळणारे क्रेडिट, जीएसटी खात्याकडून नव्याने जाहीर होणारी सवलत योजना या बाबत करसल्लागारांनी सुद्धा सखोल माहिती घेऊन कामकाज करणे आवश्यक असल्याचे मत नोंदवून, येणाऱ्या कालावधीमध्ये जीएसटी विवरणपत्रकातील होणारे बदल, नोंदणी बाबतच्या होऊ घातलेल्या नवीन तरतुदी, न्युट्रल अल्कोहोल, मालपुरवठादाराने व्यापाऱ्याला दिलेल्या डिस्काऊंट बाबत तसेच टीसीएस बाबतच्या तरतुदी, जीएसटी विभागाने जाहीर केलेली नवीन परिपत्रके,  अनोंदणीकृत जीएसटी व्यापाऱ्याकडील खरेदी केलेल्या मालावरील आरसीएम बाबतच्या तरतुदी सविस्तरपणे विषद करून, जीएसटी कायद्यात नव्याने होणारे बदल लक्षात आणून दिले. तसेच या प्रसंगी उपस्थितांच्या प्रश्नांचे समाधान केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांचा परिचय सौ.नीता डोंगरे यांनी करून दिला. सूत्र संचालन सीए चेतन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नयन निऱ्हाळी यांनी  केले. वेबिनार साठी उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगर, नाशिक, मालेगाव, धुळे, याचबरोबर सोलापूर, सातारा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्राबाहेरील कर व्यावसायिकांनी या वेबिनार साठी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!