प्रतिनिधी (नाशिक): बारा ज्याेतिर्लिंगांपैकी एक असलेल्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे नाशिकसह राज्यभरातील भाविक रविवारी (दि. १८) सकाळपासूनच दाखल झाल्याचे दिसून आले. तिसरा श्रावण साेमवार असल्याने भाविकांच्या गर्दीचा आकडा रविवारीच तीस हजारांपार गेल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, साेमवारी किमान दाेन लाख भाविक त्र्यंबक नगरीत दर्शनासाठी व ब्रह्मगिरी फेरीसाठी दाखल हाेणार असल्याचा अंदाचही वर्तवण्यात आला आहे. रविवारी दिवसभर नाशिक-त्र्यंबक दरम्यान रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. खंबाळे येथे वाहने अडवण्यात येऊन त्यांना येथील पार्किंगमध्ये वाहने उभी करण्याच्या सूचना पाेलिसांकडून देण्यात आल्या. येथून भाविकांना बसेसद्वारे त्र्यंबकनगरीत पाठवले जात हाेते.
तिसरा श्रावण साेमवार आणि वीकेंडसह रक्षाबंधन अशा सलग तीन सुट्यांमुळे साेमवारच्या पूर्वसंध्येलाच त्र्यंबक नगरी गजबजली. त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी शनिवारपासूनच भाविकांची गर्दी झाली. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत रांगा कायम होत्या. तर शनिवारी मुक्कामी असलेल्या व पहाटे खाजगी वाहनाने आलेल्या भाविकांनी त्रंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ पहाटे ४ वाजेपासूनच गर्दी केल्याचे दिसून आले. जुन्या महादेव मंदिराकडे व जिल्हा उपरुग्णालयाकडे अशा दुहेरी, तिहेरी रांगामुळे भाविकांची पहाटे ५ वाजता पूर्व दरवाजा दर्शनासाठी उघडताच चेंगराचेंगरी झाली. विशेष म्हणजे, पेड दर्शनासाठी नेमकी कुठे रांगा लावायच्या, कुठे विचारणा करायची, याबाबत संभ्रम उडाल्याने बाहेर जिल्ह्यातील भाविकांचा माेठा गाेंधळ उडाला. गेल्या रविवारी, साेमवारीदेखील याचप्रकारे दर्शनरांगांतील गाेंधळ, वाद, चेंगराचेंगरीचे प्रकार घडल्याने तिसऱ्या श्रावण साेमवारी वाढती गर्दी लक्षात घेता किमान याेग्य व्यवस्था हाेईल, अशी भाविकांची अपेक्षा यंदाही फाेल ठरल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
झटपट दर्शनासाठी काहींची फिल्डींग
त्रंबकेश्वर मंदिरात झटपट दर्शनासाठी विविध राज्यांतून आलेल्या भाविकांना घेरून त्यांना प्रतिव्यक्ती दाेन ते तीन हजार रुपये घेऊन दर्शनासाठी नेले जात असल्याची चर्चा हाेती. अनेक सीसीटीव्ही कॅमेरे व जादा सुरक्षारक्षक नेमूनही गाेंधळाची स्थिती कायम असल्याने अनेक परप्रांतीय भाविकांच्या लुटीचे प्रकारही सुरूच असल्याची चर्चाही सुरू हाेती.दुपारी ३ नंतर बरसल्या श्रावण सरी
तिसऱ्या श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला त्र्यंबक नगरीत भाविकांपाठाेपाठ दुपारी ३ नंतर जाेरदार श्रावण सरीही बरसल्या. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी आलेल्या भाविकांची पावसामुळे तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने बसस्थानकातही चिखल झाला, त्यामुळे भाविकांना मार्गक्रमण करणे गैरसाेयीचे बनले हाेते. रविवारी रात्रभर ते सोमवार दुपारी उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम राहणार असल्याने एसटी महामंडळाच्या वतीने जादा बसेस तर पोलिस प्रशासनाकडून ५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विशेष व्यवस्था केली आहे.
- ब्रह्मगिरी फेरीसाठी ३५० बसेस
- दर पाच मिनिटांनी नवीन बसस्थानकातून बसेस
- नाशिकहून त्र्यंबकपर्यंत एसटीच्या एकूण २७० जादा बसगाड्या
- १९० गाड्या नाशिकहून तर ५० गाड्या खंबाळा येथून त्र्यंबकेश्वरपर्यंत
सिटी लिंककडून एकूण ८० जादा बसगाड्या
पाेलिस बंदाेबस्त असा…एक अप्पर अधीक्षक, एक उपविभागीय अधिकारी, सहा वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, २० पाेलिस उपनिरीक्षक, १५० कर्मचारी, ५० महिला कर्मचारी आणि १०० हाेमगार्ड यांचा पार्किंग स्थळासह त्र्यंबक परिसरात बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.—–
खंबाळे येथे पार्किंग व्यवस्था
नाशिकसह राज्यभरातून येणाऱ्या खासगी वाहनांसाठी त्र्यंबकराेडवरील खंबाळेनजिक दाेन ते अडीच एकरवर पार्किंग व्यवस्था करण्यात अाली आहे. रस्त्यावर ग्रामीण पाेलिसांकडून बॅरिकेड्सद्वारे रस्ता बंद करण्यात आला असून, वाहनचालकांना पार्किंगस्थळाकडे वाहने उभी करण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. याशिवाय ध्वनिक्षेपकांद्वारे भाविकांना सातत्याने सूचना केल्या जात आहेत. केवळ एसटी बसेस, सिटी लिंक आणि शासकीय, आपत्कालिन सेवेतील वाहनांसह स्थानिकांच्या वाहनांनाच प्रवेश दिला जात आहे.
त्र्यंबकच्या प्रवेशद्वारावरील बसस्थानक गजबजले
त्र्यंबक नगरीत प्रवेशद्वारासमाेरच असलेल्या बसस्थानकात सर्व बसेस उभ्या केल्या जात आहेत. खासगी वाहनांना बंदी असल्याने बसद्वारेच लाखाे भाविक त्र्यंबक नगरीत दाखल हाेत आहेत. त्यामुळे प्रवेशद्वार परिसर दिवसभर गजबजलेला दिसून येत आहे.
