प्रधान सचिव डवले यांच्या यंत्रणेला सूचना
नाशिक (प्रतिनिधी) : लाडकी बहीण ही राज्याचा महत्वकांक्षी याेजना आहे. काेणत्याही परिस्थितीत पात्र लाभार्थी या याेजनेपासून वंचित राहता कामा नये. याेजनेची नाेंदणी जलद गतीने करण्याची सूचना ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यंत्रणेला दिले.
लाडकी बहीण याेजनेचा वाॅर रूम त्र्यंबकेश्वर येथे असून शुक्रवारी (दि.२) ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी वाॅर रूमला भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. या याेजनेची नाेंदणी करताना पाेर्टलमध्ये तांत्रिक बिघाड हाेत असल्याने लाभार्थ्यांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक दाैऱ्यावर आलेल्या प्रधान सचिव डवले यांनी वाॅर रूमला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सीईओ डाॅ. अर्जून गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. वर्षा फडाेळ, नाशिकच्या गट विकास अधिकारी साेनिया नाकाेडे, त्र्यंबकेश्वरच्या तहसिलदार श्वेता संचेती आदी उपस्थित हाेते.
