नाशिक (प्रतिनिधी): रिक्षा, टॅक्सी, टेम्पो व ट्रक चालक-मालक महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसह केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात शुक्रवारी दि. १२ जुलै रोजी बी. डी. भालेकर मैदान येथून महामोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या विविध मागण्या मांडत मोर्चाविषयी माहिती दिली.
वाहनांच्या योग्यता प्रमाणात नूतनीकरणाच्या एक दिवस विलंब झाल्यास त्यास ५० प्रत्येक दिवसासाठी दंड आकारला जातो. ही कारवाई जुलमी पद्धतीची असून, हा अन्यायकारक कायदा रद्द करण्यात यावा. कोणत्याही रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्यास, तसेच आजारी असेल किंवा त्याचे कुटुंबीय आजारी असतील आणि त्यामुळे वाहन पासिंगला विलंब झाला, तर ५० रुपये रोज याप्रमाणे त्याचा विलंब शुल्क १८ हजार रुपये प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दंड आकारणी केली जाते आणि त्याशिवाय संबंधिताचे वाहन पासिंग केले जात नसल्याची माहिती यावेळी महासंघाचे अध्यक्ष सुनील बागूल, कार्याध्यक्ष भगवंत पाठक, प्रकाश लोंढे, शशी उन्हवणे, मामा राजवाडे यांनी दिली. जुनी रिक्षा असेल आणि तिची किंमत ५० हजार असेल, तर १८ हजार दंड भरणे वा आकारणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालकांचे उत्पन्न कोविड महामारीमुळे अत्यंत कमी झालेले असून, अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. कुटुंबात लहान-मोठे आजार, वाहनांच्या कर्जाची परतफेड, घरभाडे, वीज व पाणी बिल, अपघात, रिक्षा, टॅक्सी देखभाल व योग्यता प्रमाणापत्र, परमिट नूतनीकरण, तसेच पासिंग, इन्शुरन्स या सर्व खर्चीक बाबी आर्थिकदृष्ट्या परवडणाºया नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाह करावा की वाहनांची देखभाल करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रवासी वाहतूक करताना ओला, उबेर यांसारख्या कंपन्या, तसेच खासगी विद्यार्थी प्रवासी वाहतूक शहरात ७५ टक्के होत आहे. तसेच, विना परवाना स्क्रॅप रिक्षांमुळे आम्ही संकटात सापडलो असून, ज्येष्ठ नागरिक, अंध, महिलांना मोफत प्रवास यामुळे व्यवसाय करणे अवघड झाल्याची बाब चालक-मालक महासंघाने निदर्शनास आणून दिली. यावेळी श्रमिक सेनेचे, रिक्षा आटो युनियन, वंचित बहुजन आघाडी, आरपीआयचे राजेंद्र वाघले, अशोक अडांगळे, कैलास बारवकर, माधव वाणी, बाळासाहेब गायकवाड, गणेश रणमाळे, पप्पू शेख, पवन पवार, हैदर सय्यद, शंकर बागूल, समीर शेख, नीलेश शेलार, माजिद पठाण, नंदलाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
