वाडिव-हे पोलीस ठाण्यात दाखल खूनाच्या गुन्ह्यातही समावेश
नाशिक (प्रतिनिधी): पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत थरारक पाठलाग केल्याने संशयित हलोल शहर परिसरात हाती लागला असून त्याचा एका खुनाच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. बँकेचे लॉकर फोडून कोट्यावधींचे सोने लांबविणा-या टोळीतील संशयितास गुंडा विरोधी पथकाने गुजरात राज्यातील जंगलात सिनेस्टाईल जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश कैलास चौधरी (वय २७, रा. महाराणा प्रताप चौक, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गंगापूर नाका भागात गेल्या ४ जून रोजी ही घटना घडली होती. आयसीआयसीआय फायनान्स कंपनी लिमिटेड, गंगापूर नाका शाखेतील तिजोरीतून चोरट्यांनी तब्बल ४ कोटी ९२ लाख रूपये किमतीचे सोन्याचे अलंकार लांबविले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस तपासात वैभव लहामगे, तुकाराम गोवर्धने, रतन जाधव, सतिश चौधरी व अर्जुन पाटील नामक संशयितांची नावे उघड झाल्याने पोलिसांनी त्यांची धरपकड मोहिम हाती घेतली. त्यातील संशयित सतिश चौधरी, रतन जाधव व अर्जुन पाटील फरार होते. पोलीस उर्वरीत संशयितांच्या मागावर असताना शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पोलिसांच्या हाती लागला. ही कारवाई आयुक्त संदीप कर्णीक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण, मलंग गुंजाळ, डी. के. पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, गणेश भागवत, नितीन गौतम, गणेश नागरे, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड आदींच्या पथकाने केली.
- संशयित रतन जाधव व सतिश चौधरी यांनी स्विफ्ट कार खरेदी केली असून, ते गेल्या १५ ते २० दिवसांपासून आध्रप्रदेश, कर्नाटक व राजस्थानात फिरून सध्या गुजरात राज्यात मुक्कामी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. गुंडा विरोधी पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुजरात राज्यातील हलोल शहर गाठून परिसर पिंजून काढला.
- पोलिसांनी हलोल तळ ठोकला असताना संशयित नुकतेच तिरूपती बालाजी येथे जावून आल्याची माहिती पथकास मिळाली. दोघांनी डोक्यावरील केस काढलेले असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केस नसलेल्या संसयितांवर लक्ष केंद्रीत केले. पोलीस दोघांचा शोध घेत असतांना सोमवारी (दि.१७) डोक्यात टोपी घातलेले तरूण स्विफ्ट कार एमएच १२ एव्ही ०८१८ मधून प्रवास करताना आढळून आले.
- पोलिसांनी तात्काळ संशयितांचा पाठलाग केला. मात्र चाहूल लागताच भामट्यांनी धूम ठोकली. जवळपास ८ ते १० किमी हा सिनेस्टाईल पाठलागाचा थरार सुरू होता. पोलिसांनीही त्याचा पिछा पुरविल्याने संशयितांनी शहराबाहेरील जंगलाजवळ वाहन सोडून पोबारा केला. पथकातील कर्मचा-यांनी जंगल पिंजून संशयित सतिश चौधरी यास हुडकून काढले असून, तो घनदाट जंगलात एका झाडाच्या मागे लपून बसला होता. संशयिताचा वाडिव-हे पोलीस ठाण्यात दाखल खूनाच्या गुन्ह्यातही समावेश असून त्या गुन्ह्यातही तो फरार होता.
