नाशिक (प्रतिनिधी): रेल्वेस्थानक परिसरात सकाळी एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी पेडलर दाम्पत्य येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणा-या मालेगाव येथील दाम्पत्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या अंगझडतीत सुमारे तीन लाख ६० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ मिळून आला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू (वय ४५) व शबाना अब्दुल समद अन्सारी (वय ४०, दोघे रा. कमलापुरा आखाडा मशिदीजवळ, मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नाव आहेत. पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. स्टेशनबाहेर सापळा लावण्यात आला असताना अन्सारी दाम्पत्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत बाबू अन्सारी याच्याकडे ६१.५ ग्रॅम वजनाचा सुमारे तीन लाख सात हजार ५०० रुपये किमतीचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ मिळून आला. तर शबानाच्या अंगझडतीत सुमारे ५२ हजार ५०० रुपये किमतीचा व १०.५ ग्रॅम वजनाचा एमडी अमली पदार्थ आढळून आला. त्यामुळे संशयित दाम्पत्यास बेड्या ठोकत पथकाने त्यांच्या ताब्यातील अमली पदार्थासह अन्य वस्तू असा सुमारे तीन लाख ८० हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संशयितांना मुद्देमालासह नाशिकरोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे, सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, जमादार रंजन बेंडाळे, संजय ताजणे, देवकिसन गायकर, हवालदार बळवंत कोल्हे, अंमलदार गणेश वडजे, अनिरुद्ध येवले, योगेश सानप, बाळासाहेब नांद्रे, चंद्रकांत बागडे व अर्चना भड आदींच्या पथकाने केली.
