नाशिक (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून वॉटर ग्रेस कंपनीच्या कर्मचा-याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना पंडित कॉलनीत मंगळवारी (दि. १) घडली. भल्या पहाटे देखरेखीचे काम आटोपून घराकडे परतणा-या आकाश ऊर्फ शिवम संतोष धनवटे (वय २१, रा. घारपुरे घाट, गोदावरी नगर) या सुपरवायझरची वाट अडवून दुचाकीस्वार टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात जखमी झालेल्या आकाशचा उपचारादरम्यान दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलीस पथके हल्लेखोरांच्या शोधार्थ ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश धनवटे हा वॉटर ग्रेस कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. मंगळवारी पहाटे तो कामावर गेला होता. कॉलेज रोड, गंगापूर रोड भागातून देखरेख करून तो मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीत गेला. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या टोळक्याने आकाशची वाट अडवून धारदार कोयता व चॉपरने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात धनवटे गंभीर जखमी झाला. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांत कैद झाली आहे. दुचाकीवर आलेल्या तिघांनी एकापाठोपाठ एक असे सपासप वार करून हत्यारे सोडून पोबारा केल्याचे समजते.
सकाळी शतपावलीसाठी जाणा-या नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आल्याने घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडासह गंगापूर आणि भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी जखमी आकाशला भाऊ मकरंद धनवटे याने जिल्हा रुग्णालयामार्फत एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास त्यास वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला असता नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती.
