सटाणा (प्रतिनिधी): सटाणा-मालेगाव रस्त्यावरील ब्राह्मणगावजवळ एका कंटेनरमधून म्हशींची वाहतूक होत असल्याचा संशय ग्रामस्थांना आल्याने त्यांनी तो कंटेनर अडवला असता, त्यात म्हशी असल्याचे समोर आले. याबाबत सटाणा पोलिसांना कळवताच पोलिसांनी कंटेनर पोलीस ठाण्यात आणून म्हशींची सुखरूप सुटका केली. त्यातील दोन म्हशींचा मृत्यू झाला असून एक म्हैस अत्यावस्थ अवस्थेत असल्याचे पशू वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
पोलिसांनी कंटेनर चालक शाहरुख खान मिसरी खान बलूच (रा. वागोरुद, जि. पाटण) याला ताब्यात घेऊन कंटेनरसह २९ म्हशी असा एकूण २४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गुजरात राज्यामधून मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी म्हशी घेऊन जाणारा कंटेनर ब्राह्मणगावजवळ उभा राहिला असता, म्हशीचे पाय बांधलेले असल्यामुळे त्यांच्या हालचालीने कंटेनर हालू लागला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी कंटेनरची चौकशी करत पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस कर्मचारी रामसिंग जाधव, आर. बी. ठोके, गणेश गरुड हजर झाले. पोलिसांनी कंटेनरची चौकशी केली असता आतमध्ये म्हशी असल्याचे निदर्शनास आले. सदरच्या म्हशी कत्तलीसाठी पुढे जात असल्याने पोलिसांनी कंटेनरला जागेवरच रोखून चालकाची विचारपुस करीत ग्रामस्थ व पोलीस बंदोबस्तात कंटेनर सटाणा पोलिसात आणला.
येथील पोलीस परेड मैदानावर कंटेनरमधील म्हशी पोलीस हवालदार रुपेश ठोके, रायसिंग जाधव, उमाकांत बच्छाव, यशवंत भोये, हरी शिंदे, उमेश भदाणे व प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यकर्त्यांसह जगन्नाथ अहिरे, योगेश नेरकर, राकेश पवार यांनी खाली उतरवल्या. यावेळी तीन म्हशी अत्यावस्थ असल्याचे दिसून आल्याने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फुणसे यांनी म्हशींची तपासणी केली असता, दोन म्हशींना मृत घोषित केले तर एक अत्यावस्थ असल्याने तिच्यासह इतर २७ म्हशींवर उपचार केले. पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस तपास करीत आहे. २७ म्हशींना मालेगाव येथील पांजरापोळमध्ये हलविण्यात आले आहे.
