पिण्याच्या पाण्याची सधा ही बोंबच! तर शहरातील वाहनचालक करतोय मणक्याच्या आजाराचा सामना!

शहरात खड्यांच्या रस्त्यावर जाणे येणे झाले सामन्य नागरिकांना अवघड!

नाशिक (प्रतिनिधी): वर्षात अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे करणा-या बांधकाम विभागाला शहराच्या आसपास उभ्या राहणा-या नवीन नागरी वसाहतींचा विसर पडला की काय, अशी स्थिती त्या ठिकाणांची झालेली आहे. आज खेडोपाडी रस्ते होत आहेत; मात्र नाशिक शहरातील अनेक नववसाहतींमध्ये साधा खडीचा देखील रस्ता नाही. यामुळे वाहनचालक महिला असो वा पुरुष यांना मणक्याच्या त्रासाला बळी जावे लागत आहे. त्यामुळे आपण स्मार्ट सिटीत राहतो, की एखाद्या दुर्गम भागात असा प्रश्न या नवीन कॉलनी, तसेच वसाहतींमधील नागरिकांना पडावा, अशी विदारक स्थिती आहे.
बांधकाम विभागाच्या माध्यमातून वर्षाकाठी अडीचशे ते तीनशे कोटी रुपये रस्त्यांवर खर्च केले जातात. मात्र, यातील किती निधीचा वाटा शहराच्या आजूबाजूला मनपा हद्दीतील नवीन वसाहतींमधील रस्त्यांवर खर्च केला जातो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील लोंढे पुल ते खुटवडनगर, त्र्यंबक रोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड, इंदिरानगर, गोविंदनगर यांसारख्या भागातील रस्त्यांवर वारंवार खर्च होतो. जरा खड्डा पडला तरी त्याची देखभाल दुरुस्ती आवर्जून केली जाते. मात्र, शहराची चौफेर वाढ होत असताना तेथील सोयीसुविधांकडे मुद्दामहून काही अधिका-यांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कोणत्या भागाचा विकास करायचा हे देखील अधिकारीच ठरवत असल्याने आज सातपूर, पाथर्डी गाव परिसर, आडगाव, दसक पंचक, मखमलाबाद व परिसर अशा अनेक भागांतील नवीन वसाहती, तसेच कॉलन्यांमध्ये डांबरी किंवा काँक्रीट रस्ते नावाचा प्रकारच दिसून येत नाही. त्यामुळे कच्च्या रस्त्यांवरून या ठिकाणच्या नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते. प्रत्येक पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाटचाल करावी लागते. संबंधित नवीन वसाहतींमधील नागरिकांकडून महापालिकेला पाणीपट्टी, घरपट्टी, विकास शुल्क असा सर्व प्रकारचा कर मिळतो, असे असताना त्याठिकाणी रस्ते नाहीत. पाणी देखील कमी दाबाने मिळत असल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी बोअरवेलवरच अवलंबून राहावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!