नाशिक (प्रतिनिधी): सुमारे ६५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चेनवर चोरट्यांनी डल्ला मारला असून बसमध्ये चढत असताना वृद्ध प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना ठक्कर बाजार बसस्थानकात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सीताराम महाडिक (वय ६५, रा. कांदिवली, मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महाडिक गेल्या २६ डिसेंबर रोजी मुंबईहून शहरात आले होते. सकाळच्या सुमारास ते कळवण येथे जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात गेले असताना ही घटना घडली. नाशिक-कळवण बसमध्ये चढत असताना गर्दीची संधी साधत अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची सोन्याची साखळी हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत.
तसेच दुसरीकडे रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना काठे गल्लीतील त्रिकोणी गार्डन भागात घडली. या घटनेत सुमारे सव्वा लाखाच्या सोन्याच्या पोतवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता विनायक दाणी (रा. काठेगल्ली, द्वारका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दाणी शुक्रवारी (दि.३) सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्रिकोणी गार्डन परिसरातून त्या आपल्या घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. दुचाकीवर डबलसीट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख १२ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. अधिक तपास सहायक निरीक्षक पवार करीत आहेत.
