मविप्र-एमकेसीएलदरम्यान सामंजस्य करारामुळे आता नाशिकमध्येच पेटंट नोंदणी!

नाशिक (प्रतिनीधी): कोणत्याही संशोधनात बौद्धिक संपदा स्वामित्व (पेटंट) मिळविण्यासाठी नाशिकच्या संशोधकांना दिल्लीचे दरवाजे ठोठावे लागत होते. आता ही प्रक्रिया नाशिकमध्ये सुलभरीत्या होणार आहे. यासाठी मविप्र प्रज्ञा सेंटर, अर्थात सेंटर फॉर प्रमोशन अवेअरनेस ॲण्ड रिसर्च ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲण्ड इनोव्हेशन आणि एमकेसीएल यांच्यात तीन वर्षांचा बौद्धिक संपदा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारामुळे एमकेसीएलचे तीन इंटर्न्स पुढील तीन वर्षांसाठी नाशिक मविप्रमध्ये आपली सेवा देणार आहेत. यासंदर्भात पुणे येथे एमकेसीएलच्या कार्यकारी अधिकारी बीना कामत आणि मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी एमकेसीएलचे प्रमुख सल्लागार विवेक सामंत, उदय पाचपोर आणि मविप्र प्रज्ञा सेंटरच्या संचालिका डॉ. मृदुला बेळे आदी उपस्थित होते. मविप्रच्या प्रज्ञा सेंटरच्या माध्यमातून इनोव्हेशन व इन्क्युबेशनचा लाभ राज्यातील अनेक उदयोन्मुख व्यावसायिक व स्टार्टअप्स घेऊ शकतील. या सेंटरचा लाभ केवळ मविप्रच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर नाशिकमधील व्यावसायिक, कारखानदार, संशोधक, कर्मचारी यांना घेता येणार आहे.

शासनाच्या धोरणात नवीन शैक्षणिक धोरणात पेटंटला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. या अनुषंगाने मविप्र संस्थेने प्रज्ञा सेंटरची स्थापना केली आहे. केंद्र सरकारच्या २०४७ च्या व्हिजनला अनुसरून विद्यार्थी घडविण्याचे कार्य या सेंटरमार्फत होणार आहे. संस्थेव्यतिरिक्त इतरही संशोधकांनीही या सेंटरचा लाभ घ्यावा.

– ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!