मिशन सिंहस्थकुंभमेळा: नाशिक मनपा करणार लवकरच प्रयागराज दौरा!

नाशिक (प्रतिनीधी): नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त लाखो पर्यटक, भाविक तसेच साधू, महंत येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मनपाच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने मनपाने नियोजन सुरू केले असून, सुमारे १६ हजार कोटींचा प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून शहरासह परिसरात, तसेच गोदावरी नदीकिनारी व साधुग्राम येथे विविध विकासकामे आणि प्रकल्प साकारण्यात येणार आहेत. त्याच पर्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात नाशिक मनपाने सुमारे १६ हजार कोटींचा आराखडा तयार करून तयारी सुरू केली आहे. सिंहस्थासाठी येणारे भाविक, साधू, महंतांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून याविषयी माहिती घेण्यासाठी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या नेतृत्वाखाली मनपा अधिकाऱ्यांचे पथक लवकरच प्रयागराज येथे दौरा करणार आहेत.
विभागीय महसूल आयुक्त, तसेच जिल्हाधिका-यांनी केलेल्या सूचनेनुसार मनपाच्या सिंहस्थ आराखड्यातील प्रस्तावित कामांची स्थळ पाहणी आयुक्त डॉ. करंजकर यांच्याकडून सुरू आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरांतर्गत व बाह्य रिंगरोडच्या मिसिंग लिंक जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे. अशा विविध कामांच्या दृष्टीने मॉडेल, तसेच कामांविषयी अधिक माहिती घेण्याकरिता प्रयागराज येथील कामांची पाहणी करण्यात येणार आहे. तेथे २०२५ मध्ये म्हणजे पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. तेथील कुंभमेळ्याची तयारी देखील पूर्ण झाली आहे. यामुळे विकासकामे व पायाभूत सुविधा पाहण्याच्या दष्टीने प्रयागराज दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांतर्गत नदीघाट विकास, तसेच अनेक मूलभूत विकासकामे प्रयागराज येथे उभी राहिली आहेत. साधू-महंतांसाठी साधुग्रामच्या उभारणीचे सुयोग्य नियोजन तेथे वर्षभराआधीच झालेले आहे. त्यामुळे प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!