प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या प्रयत्नांना यश…
सटाणा (प्रतिनीधी) : येथील म.वि.प्र. समाज नाशिक संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य आणि विज्ञान, महाविद्यालयात पंचक्रोशीतील ३६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी कला, वाणिज्य, विज्ञाण, किमान कौशल्य, हॉर्टीकल्चर, संगणकशास्र व बी.बी.ए. यांसारख्या पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. सध्या सटाणा बस स्थानका पासून विद्यार्थ्यांना पायी किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत होता. परंतु आता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून महाविद्यालयापर्यंत सलग बस पास सुविधा मिळणार आहे. या संदर्भाचे पत्र सटाणा आगार चे व्यवस्थापक राजेंद्र शिवाजी आहिरे यांनी प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांना दिले.
शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अंगीकार करून सन १९६७ सालापासून सटाणा महाविद्यालयास गुणवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा आहे. महाविद्यालयाच्या या यशस्वी वाटचालीत संस्थाचालक, प्राध्यापक यांसोबतच आजी-माजी विद्यार्थ्यांचेही महत्वाचे योगदान राहीले आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन मैंद हे सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागाचे महाव्यवस्थापक आहेत. त्यांच्या विशेष सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे.
त्याबद्दल म.वि.प्र. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, महिला संचालिका श्रीमती शालनताई सोनवणे व बागलाण तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनावणे यांनी नितीन मैंद, राजेंद्र आहिरे व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विशेष आभार मानले आहेत. त्यासोबतच सध्याच्या स्पर्धेच्या युगात पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या म.वी.प्र. संस्थेच्या सटाणा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पाठवावे असे आवाहन देखील केले.
