नाशिक (प्रतिनिधी): जिल्हाधिक-यांनी पर्यावरण पूरक पावले उचलताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी सार्वजनिक वाहतूकीने कार्यालयात येणार आहे.
शहरात वाढत्या वाहनांची संख्या व प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेता एक दिवस सर्व वाहनांना विश्रांती घेऊन शासनाने उपलब्ध केलेल्या सार्वजनिक यंत्रणेचा वापर करून कार्यालयात येण्याचा दंडक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घातला आहे. ही प्रणाली केवळ एक दिवसासाठी असली तरी या योजनेच्या यशावरुन भविष्यात जिल्ह्यातील इतर सर्वच कार्यालयांमध्ये याचा अवलंब केला जाईल आणि येण-या काळामध्ये दर सोमवारी ही प्रक्रिया केली जाईल, असे बोलले जात आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ जाहीर केलेला असताना कर्मच-यांना युनिफॉर्मचे बंधनही करण्यात आले आहे. त्यादिवशी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सर्व निळ्या रंगाचा शर्ट व डार्क निळ्या रंगाची अथवा काळ्या रंगाची पॅन्ट तर महिला कर्मच-यांसाठी पिवळ्या रंगाचा कुर्ता अथवा साडी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे येणारा सोमवार हा जिल्हाधिकारी कार्यालयासाठी वेगळा दिवस ठरणार आहे. विभागनिहाय सर्वच कर्मच-यांनी युनिफॉर्म घेतले असून, त्यामुळे विभागाच्या रंगात एकसमानता दिसून येणार आहे. बुधवार (दि. १) पासून जिल्हाधिकारी कार्यालयात युनिफॉर्मचे वितरण करण्यास सूरुवात झाल्याने विक्रेत्यांची लगबग पहायला मिळाली.
