नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा शासकीय रुग्णालयातून बाळाची चोरी करणा-या संशयित महिलेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. १२ तासांतच चोरी गेलेले बाळ जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नाने आईच्या कुशीत विसावले आहे. याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील संशयित महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ शनिवारी (दि. ४) अज्ञात महिलेने चोरले होते. मूळ रा. मध्य प्रदेश व हल्ली ठेंगोडा (ता. सटाणा) येथे वास्तव्यास असलेल्या सुमन अब्दुल मोहम्मद कलीम (वय २३) या विवाहितेस दि. २८ डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर बाळ आणि बाळंतिणीला पीएनसी वॉर्डात हलविण्यात आले होते. या ठिकाणी शस्त्रक्रिया झालेल्या सुमनसह बाळावर उपचार करण्यात येत होते, तर मोलमजुरी करणारा पती अब्दुल कलीम दिवसभर तेथे बसून मायलेकाची देखभाल करीत होता. या दाम्पत्याच्या संपर्कात एक अनोळखी महिला आली. या महिलेने दाम्पत्याचा विश्वास संपादन करीत मुलगा पळवून नेले होते. मातेशी ओळख वाढवत या महिलेने डिस्चार्जच्यावेळी मातेच्या डोळ्यासमोर बाळासह पळ काढल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड व गुन्हे शाखा युनिट एकचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी शोध मोहीम राबवली.
अब्दुल सलाम मोहमंद कलीम खान (रा. ठेंगोडा, ता. सटाणा)यांची पत्नी जिल्हा रुग्णालयात प्रसूत झाल्यानंतर मुलास डिस्चार्ज दिल्यानंतर ते ब्लड रिपोर्ट घेण्याकरीता गेले. या दरम्यान जुजबी ओळख झालेल्या सपना असे नाव सांगणा-या अनोळखी महिलेने बाळ त्याच्या आईकडे नेऊन देते, असे सांगून बाळ पळविले होते. गुन्हेशाखा युनिट १ च्या पोलीस पथकाने घटनास्थळास भेट देत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ही महिला बालकासह दिंडोरी तालुक्यात कादवानगर भागात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कसून शोध घेतला असता ही संशयित महिला कादवानगर, ग्रीन सिटी परिसरात बालकासह सापडली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. बालकास त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले असून, आपले बाळ पुन्हा कुशीत येताच सुमनच्या डोळ्यातून आनंदाचे आसवे ओघळली. सहायक पोलीस निरीक्षक तोडकर व पथकाने महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे यांच्या मदतीने महिलेस ताब्यात घेतले.
