नाशिक (प्रतिनिधी): मोटरसायकलच्या खोपडीत नागोबा आढळून आल्याने चालकासह बघ्यांची एकच धावपळ उडाली. येवला-लासलगाव मार्गावर गावालगतच्या पंपावर पेट्रोल भरताना नाग दिसून आला. त्यास पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.
पावसाळ्यात बिळात पाणी जात असल्यामुळे व वाढत्या उष्णतेमुळे सर्प, उंदीर बाहेर येऊन निवारा शोधून दडून बसतात. असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडला. या मोटरसायकल चालकाने घरापासून मोटरसायकल चालवत आणली असतानादेखील साप गाडीतच होता. पेट्रोल भरण्यासाठी स्विचमधून चावी काढताना चक्क समोर साप फणा उभारून फुसकारी मारत असल्याचे बघून चालक घाबरला. सभोवतालच्या लोकांनी धाव घेत साप बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्न केले. मात्र, साप घाबरून आत शिरला. काही केल्या बाहेर येत नव्हता.
तासाभराच्या प्रयत्नानंतर सर्पमित्र सचिन रेंढे यांना बोलविण्यात आले. रेंढे यांनी सापाला कुठलीही इजा न होऊ देता सुखरूप बाहेर काढले. या सापाची लांबी दीड ते दोन फूट असून, काळ्या रंगाचा नाग प्रजातीतील विषारी साप असल्याचे सर्पमित्राने सांगितले. जवळच असलेल्या ठाणगाव जंगलात सापास सोडण्यात आले.
