चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी १२ वर्षांनंतर ठरला भारतीय क्रिकेट संघ!

क्रिकेट विशेष: भारतीय संघ यात पाचव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी खेळला. २००० मध्ये नैरोबीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानणारा भारतीय संघ २००२ मध्ये संयुक्त विजेता होता. २०१३ ला चॅम्पियन होण्याचा मान मिळविला तर २०१७ च्या स्पर्धेत भारताने पुन्हा उपवजेतेपदावर समाधान मानले होते. न्यूझीलंडला ५० षटकांत ७ बाद २५१ धावांत रोखल्यानंतर भारतीय संंघाने विजयी लक्ष्य ४९ षटकांत ६ बाद २५४ असे गाठले. भारतीय संघाने १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गड्यांनी पराभव करीत तिसऱ्यांदा विजेता करंडक उंचावला. रोहित शर्माच्या नेतृत्वात नऊ महिन्यांत भारताचे हे दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. २९ जून २०२४ ला भारतीय संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला होता.

पाकिस्तानच्या यजमानपदाखाली आयोजित या स्पर्धेत ‘हायब्रीड मॉडेल’नुसार भारत आपले सर्व सामने दुबईच्या मैदानात खेळला हे विशेष. फायनलमध्ये सामनावीर ठरलेल्या रोहित शर्माने झंझावाती अर्धशतक झळकावले, पण २७ व्या षटकात रचिनला मोठा फटका मारण्याच्या नादात तो यष्टिचित झाला. त्याने ८३ चेंडूत ७६ धावा केल्या. त्याआधी, शुभमन गिल (३१) आणि रोहितने १८.४ षटकांत १०५ धावांची सलामी दिली.
विराट कोहली १ धाव काढल्यानंतर मायकेल ब्रेसवेलच्या चेंडूवर पायचित झाला. यानंतर श्रेयस अय्यर – अक्षर पटेल यांनी चौथ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी केली. ३७ व्या षटकांत तिसऱ्या चेंडूवर श्रेयसने ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर षटकार खेचला. पुढच्या चेंडूवर मात्र काइल जेमिसन याने त्याचा सीमारेषेवर झेल सोडला. याचा लाभ घेण्यात अपयशी ठरलेला श्रेयस ३९ व्या षटकांत (४८) रचिनकडे झेल देत परतला. अक्षर पटेल (२९), हार्दिक पांड्या (१८) यांनी संघाला विजयाच्या दारात आणले. लोकेश राहुल (नाबाद ३४) आणि रवींद्र जडेजा (नाबाद ९) यांनी सहा चेंडूआधीच भारताचा विजय साकारला.
त्याआधी, भारतीय फिरकीपटूंच्या वर्चस्वानंतरही न्यूझीलंडने २५१ धावा ठोकून आव्हानात्मक मजल गाठली. डेरिल मिचेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी संयमी अर्धशतकी खेळी केली. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणाऱ्या न्यूझीलंडचे स्टार फलंदाज ढेपाळल्यानंतर या दोघांनी धावसंख्येला आकार दिला. मिचेलने १०१ चेंडूत ६३ आणि ब्रेसवेलने ४० चेंडूत नाबाद ५३ धावांचे योगदान दिले. फिरकीपटूंनी ३८ षटके गोलंदाजी करीत केवळ १४७ धावा दिल्या. ‘चायनामॅन’ फिरकीपटू कुलदीप यादव आणि रहस्यमयी चेंडू टाकणारा वरुण चक्रवर्ती यांनी २-२ बळी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!