नाशिकरोड लाईट बंद: एकलहरे विद्युत उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड!

नाशिक (प्रतिनिधी): महापारेषणच्या एकलहरे येथील विद्युत उपकेंद्रातील ५०७३ (१५० एमव्हीए) क्षमतेच्या एका पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी (दि. ६) बिघाड झाला होता. सोमवारी (दि. १०) सकाळी उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मर्समध्ये एकाच वेळी बिघाड झाल्यामुळे या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणारी नाशिकरोड भागातील महावितरणची उपकेंद्रे सोमवारी पहाटे प्रभावित होऊन परिसरातील वीजपुरवठा बंद झाला आहे. या पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलाच्या कामाची व्याप्ती मोठी असल्याने दुरुस्तीसाठी ४८ ते ७२ तासांचा अवधी लागणार असल्याने वीजपुरवठा दोन दिवस बंद किंवा विस्कळीत राहण्याची शक्यता महावितरणने वर्तविली आहे.
एकलहरे येथील महापारेषणच्या या विद्युत उपकेंद्रातून महावितरणच्या पंचक, मुक्तिधाम, देवळाली, भगूर, एकलहरे व सामनगाव या ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रांना पुरवठा केला जातो. मात्र, येथील तीन ट्रान्सफॉर्मर्स अनपेक्षितरीत्या बंद पडल्यामुळे एकलहरेच्या अतिउच्च दाब उपकेंद्रातून मिळणारा वीजपुरवठा महापारेषणच्या व महावितरणच्या पर्यायी उपकेंद्रांतून बॅक फीडिंग करून पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जवळपास २० मेगावॉट क्षमतेचे भार व्यवस्थापन करून गरजेनुसार चक्राकार पद्धतीने भारनियमन करून उपकेंद्रातील वाहिन्यांना टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. महापारेषणने कळविल्याप्रमाणे पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलाच्या कामाची व्याप्ती जास्त असल्याने ४८ ते ७२ तासांचा अवधी लागू शकतो. या वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास तत्काळ वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. तरी या काळात बाधित भागातील वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!